नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या खारीबारी विभागातून राज्य पोलिसांच्या विशेष दलाने अल् कायदाच्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. खारीबारी भाग 24 परगाणा जिल्हय़ातील असून येथे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. गुप्तचर विभागाने या संशयितांचा ठावठिकाणा पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी सापळा रचून या दोघांना अटक केली अशी माहिती पोलिस प्रवक्त्यांनी दिली.
या संशयितांपैकी एकजण राज्यातील दक्षिण दिनाजपूर जिल्हय़ातील गंगानगर येथील आहे. तर दुसरा हुगळी जिल्हय़ातील आरामबाग येथील आहे. त्यांच्याकडून अनेक संशयास्पद कागदपत्रे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी राज्यात अल् कायदाची पाळेमुळे रुजविण्याचा प्रयत्न केला. भरकटलेल्या तरुणांना अल् कायदाशी जोडून त्यांना दहशतवादी बनविण्याच्या कामावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, असा संशय पोलिसांना आहे.
आरोपपत्राची तयारी
या दोघांवर आरोपपत्र सादर करण्याची तयारी पोलीस करीत आहेत. तरुणांची माथी धर्मांध विचारांचा प्रसार करुन भडकाविणे, राज्यात धार्मिक संघर्ष निर्माण करणे, भारताविरोधात युद्ध पुकारणे इत्यादी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड होत आहे. दक्षिण दिनाजपूर आणि चोवीस परगाणा जिल्हय़ांमधील विशिष्ट भागांमध्ये अल् कायदाचे 17 हस्तक कार्यरत आहेत, अशी माहिती या दोघांनी प्राथमिक चौकशीत दिल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.