वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
अलतगा गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 2023 मार्च किंवा एप्रिल महिन्यात होणार असल्यामुळे यात्रेची पूर्वतयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने विधिवत पूजन करून रथासाठी पाच प्रकारच्या लाकडांची जमवाजमव करण्याचा कार्यक्रम पार पडला.
सदर लक्ष्मीदेवीची यात्रा 75 वर्षांनी साजरी होत असल्यामुळे ग्रामस्थांतून जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. यात्रेची तारीख मार्च किंवा एप्रिल 2023 मध्ये निश्चित होणार असून ती मोठय़ा उत्स्फूर्तपणे साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
देवस्थान पंच कमिटी, यात्रा कमिटी व गावातील जाणकारांच्यावतीने गावात दवंडी देऊन रथासाठी लागणाऱया लाकडांबाबत सुचित केले. त्यानुसार नागरिकांनी मरगाई मंदिरात जमून नियोजन केले. यावेळी पुरोहितांच्या सल्ल्यानुसार सुवासिनींनी पाच प्रकारच्या झाडांचे विधिवत पूजन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी मिरवणुकीने वाजत-गाजत श्री लक्ष्मीदेवीचा जयघोष करत आवश्यक लाकडे कापून श्री लक्ष्मी मंदिरात ठेऊन पूजा व आरती करण्यात आली. यात्रेसाठी अगसगा गावचा रथ वापरला जाणार असून दोन कारागीर रथाचे नक्षीकाम करणार आहेत.
आमदार सतीश जारकीहोळी यांची भेट घेणार
75 वर्षांनी अलतगा गावची यात्रा होणार असल्यामुळे ग्रामस्थ आमदार सतीश जारकीहोळींची भेट घेणार असल्याची माहिती देवस्थान कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम यांनी दिली. यात्रा शिस्तबद्ध व शांततेने पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर नियोजन सुरू असल्याचे ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे यांनी सांगितले.
यावेळी देवस्थान पंच कमिटी सचिव कल्लाप्पा चौगुले, यात्रा कमिटी अध्यक्ष सोमनाथ आलोजी, सचिव यल्लाप्पा कडोलकर, मनोहर भातकांडे, ग्रा. पं. सदस्य विनोद शिंदे, यात्रा नियंत्रण कमिटी उपाध्यक्ष अशोक धुडूम यांच्यासह गावातील संस्थांचे सदस्य, कमिटी सदस्य, तरुण मंडळे, महिला मंडळे व ग्रामस्थ उपस्थित होते.