बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला सध्या स्वतःचा रोमँटिक थ्रिलर चित्रपट ‘प्रेडी’च्या यशाचा आनंद घेत आहे. आता तिने स्वतःच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘श्री’ हा चित्रपट श्रीकांत बोला यांचा बायोपिक असणार आहे. अलायाने या चित्रपटाशी संबंधित एक छायचित्र शेअर केले असून यात ती स्वतःच्या हातांमध्ये ‘श्री’चा क्लॅपबोर्ड धरून पोझ देताना दिसून येते.
श्रीकांत बोला यांच्या बायोपिकद्वारे सेटवर परतत आहे. हा उत्तम प्रवास सुरू करण्यासाठी उत्साही असल्याचे अलायाने म्हटले आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री अलायासोबत अभिनेता राजकुमार राव काम करत आहे. राजकुमार यात उद्योजक श्रीकांत बोला यांची व्यक्तिरेखा साकारत आहे.
तुषार हीरानंदानी यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होतोय. या चित्रपटाची निर्मिती टी सीरिज आणि चॉक इन चीज फिल्म्स प्रॉडक्शन एलएलपीकडून केली जात आहे. या चित्रपटात शरद केळकर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.अलाया याचबरोबर ‘यू टर्न’, ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे. अलायाने बॉलिवूडमध्ये आता स्वतःची ओळख निर्माण केली आहे.