अंतिम फेरीत रूडला हरवून जेतेपदासह अग्रस्थान पटकावले
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा नवा चॅम्पियन बनला असून जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रूडचे आव्हान संपुष्टात आणले. या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाबरोबर एटीपी जागतिक क्रमवारीत त्याने अग्रस्थानही पटकावले आहे. अग्रस्थान पटकावणारा तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे. महिला दुहेरीत झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेसिकोव्हा व कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी जेतेपद पटकावत कारकिर्दीतील ग्रँडस्लॅम पूर्ण केले. ही स्पर्धा त्यांनी पहिल्यांदाच जिंकली आहे.
अल्कारेझ व रूड दोघेही पहिल्या ग्रॅडस्लॅम जेतेपदासाठी व अग्रस्थानासाठी अंतिम फेरीत खेळत होते. 19 वर्षीय अल्कारेझने अखेर चार सेट्सच्या लढतीत रूडवर 6-4, 2-6, 7-6 (7-1), 6-3 अशी मात करीत यश मिळविले. जेतेपदानंतर अल्कारेझला शब्द सुचत नव्हते. लहानपणापासून नंबर वन बनण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेत ते आज साकार केल्याचे तो म्हणाला.
‘नंबर वन बनणे आणि ग्रँडस्लॅम चॅम्पियन बनणे ही माझी स्वप्ने होती. त्यासाठी मी खूप खूप मेहनत घेतली आणि त्यामुळेच आज दोन्ही स्वप्ने एकाच वेळी साकार करता आली. या यशाबद्दल बोलण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत, मनात खूप भावना दाटून आल्या आहेत,’ असे तो म्हणाला. चार सेट्सची ही मॅरेथॉन लढत अल्कारेझने तीन तास 20 मिनिटांत संपवली. त्याआधी त्याला पाच सेट्सचे तीन सामने खेळावे लागले होते आणि प्रत्येक सामना रात्री उशिरापर्यंत खेळवला गेला होता. या स्पर्धेतील सात सामन्यांसाठी तो तब्बल 23 तास 40 मिनिटे कोर्टवर होता. या लढतीसाठी प्रेक्षकांनीही प्रचंड गर्दी केली होती आणि दोघांनीही दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करीत त्यांना खुश केले. वेगवान खेळ, हालचालीतील चपळता, ताकद आणि नियंत्रण, बेसलाईनवरील सफाईदारपणा आणि प्रंट कोर्टवरील फटकेबाजी व आक्रमकता यांचे दोघांनीही उत्तम सादरीकरण केले.
1973 पासून एटीपी मानांकन सुरू झाले आणि या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा 19 वर्षीय अल्कारेझ हा सर्वात युवा खेळाडू आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या लेटॉन हेविटच्या नावावर हा विक्रम होता. 2001 मध्ये हेविटने अग्रस्थान मिळविले तेव्हा तो 20 वर्षांचा होता. अल्कारेझने तीन स्थानांची प्रगती करीत अग्रस्थानी झेप घेतली. याशिवाय तो ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा राफेल नदालनंतरचा सर्वात युवा खेळाडू बनला आहे. नदालने 2005 मध्ये प्रेंच ग्रँडस्लॅम जिंकली त्यावेळी तो 19 वर्षांचा होता. याशिवाय अमेरिकन स्पर्धा जिंकणाराही अल्कारेझ हा पीट सांप्रासनंतरचा सर्वात युवा खेळाडू बनला आहे. सांप्रासने 1990 मध्ये 19 व्या वर्षी यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. कॅस्पर रूडने प्रेंच ओपन स्पर्धेतही अंतिम फेरी गाठली होती आणि त्यावेळीही त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. एटीपी क्रमवारीत तो आता सातव्या स्थानावरून दुसऱया स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरी गाठणारे दोन्ही खेळाडू पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आणि अग्रस्थान पटकावण्यासाठी लढत होते.
क्रेसिकोव्हा-सिनियाकोव्हाचे पहिले यूएस जेतेपद
महिला दुहेरीत झेक प्रजासत्ताकच्या तिसऱया मानांकित बार्बरा क्रेसिकोव्हा व कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित कॅटी मॅकनाली व टेलर टाऊनसेन्ड यांच्यावर 3-6, 7-5, 6-1 अशी मात केली. विजयी जोडी एक सेट व 4-1 अशी पिछाडीवर पडल्यानंतरही झुंजार खेळ करीत जेतेपद खेचून आणले. या स्पर्धेचे त्यांचे हे पहिलेच जेतेपद असून त्यांनी करीयर ग्रँडस्लॅम पूर्ण केले आहे. त्यांचे हे एकूण सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद असून प्रेंच ओपन 2018 व 2021, विम्बल्डन स्पर्धा 2018 व 2022 प्रत्येकी दोनदा तर ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये एकदा जिंकली आहे. करीयर स्लॅम पूर्ण करीत या जोडीने मार्टिना नवरातिलोव्हा-पाम श्रीव्हर, सेरेना व व्हीनस विल्यम्स, गिगी फर्नांडेझ-नताशा व्हेरेव्हा, सारा इराणी-रॉबर्टा व्हिन्सी यांच्या पंक्तीत स्थान मिळविले. क्रेसिकोव्हा-सिनियाकोव्हा यांनी गेल्या वर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदकही पटकावले असून त्यांनी आता करीयर गोल्डन स्लॅमही पूर्ण केले आहे. 2022 ग्रँडस्लॅम मोसमात क्रेसिकोव्हा-सिनियाकोव्हा यांनी 18-0 अशी अपराजित घोडदौड केली आहे. ताज्या क्रमवारीत सिनियाकोव्हा आता दुहेरीत अग्रस्थानी असेल तर दुहेरीत क्रेसिकोव्हा दुसऱया क्रमांकावर पोहोचेल.