वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स (कॅलिफोर्निया)
येथे झालेल्या एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस ऍलकॅरेझने तसेच कझाकस्तानच्या इलेना रिबेकिनाने अजिंक्मयपद पटकाविले.
रविवारी येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कार्लोस ऍलकॅरेझने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या जेतेपदानंतर आता ऍलकॅरेझने एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थानावर झेप घेतली आहे. ऍलकॅरेझने मेदव्हेदेवची सलग 19 सामन्यातील विजयी घोडदौड रोखली. मेदव्हेदेवने यापूर्वी एटीपी टूरवरील तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. 19 वषीय ऍलकॅरेझने इंडियन वेल्स स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखत अखेर जेतेपदालाही गवसणी घातली.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानची विम्बल्डन विजेती इलेना रिबेकिनाने बेलारुसच्या साबालेन्काचा 7-6 (13-11), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. महिला टेनिसपटूंच्या मानांकनात रिबेकिना सध्या दहाव्या स्थानावर आहे. तिने या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात विद्यमान विजेती आणि टॉप सीडेड पोलंडची स्वायटेकचा पराभव केला होता.