अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा ः पुरुष दुहेरीत राजीव राम व सॅलिसबेरी विजेते
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत नॉर्वेचा कास्पर रुड आणि स्पेनचा कार्लोस अल्कारेझ तसेच महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक आणि जेबॉर यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेत राजीव राम आणि सॅलिसबेरी यांनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात नॉर्वेच्या पाचव्या मानांकित कास्पर रुडने रशियाच्या कॅचेनोव्हचे आव्हान 7-6 (7-5), 6-2, 5-7, 6-2 अशा चार सेट्समधील लढतीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा सामना तीन तास चालला होता. दुसऱया उपांत्य सामन्यात स्पेनच्या तृतीय मानांकित कार्लोस अल्कारेझने फ्रान्सेस टायफोचा 6-7 (6-8), 6-3, 6-1, 6-7 (5-7), 6-3 असा पराभव केला. तब्बल चार तासापेक्षा अधिक रंगलेल्या या सामन्यात अल्कारेझचा खेळ अधिक दर्जेदार झाला. त्याने बेसलाइन खेळावर तसेच अचूक वेगवान सर्व्हिसवर अधिक भर दिला होता. पण टायफोचा खेळही तितकाच दर्जेदार झाला. रविवारी रुड आणि अल्कारेझ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड ईगा स्वायटेकने या स्पर्धेत दर्जेदार खेळ करत विजय नोंदविला. स्वायटेकने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दित पहिल्यांदाच या ग्रँड स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. तिला यापूर्वी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नव्हती. उपांत्य लढतीत स्वायटेकने सहाव्या मानांकित सॅबेलिनेकाचा 3-6, 6-1, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. 2022 टेनिस हंगामामध्ये स्वायटेकने ग्रँड स्लॅम स्पर्धेत दुसऱयांदा अंतिम फेरी गाठली. यापूर्वी तिने पॅरिसमध्ये प्रेंच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवित जेतेपद मिळविले. हा सामना सव्वा दोन तास चालला होता. महिला एकेरीच्या दुसऱया उपांत्य सामन्यात पाचव्या मानांकित जेबॉरने फ्रान्सच्या कॅरोलिनी गार्सियाचा 6-1, 6-3 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शनिवारी स्वायटेक आणि जेबॉर यांच्यात महिला एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होत आहे.
अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत राजीव राम आणि जो सॅलिसबेरी यांनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पुन्हा स्वतःकडे राखले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात राजीव राम आणि सॅलिसबेरी या जोडीने शुक्रवारी द्वितीय मानांकित जोडी वेस्ले कुलहॉप आणि निल स्कुपेस्कि यांचा 7-6 (7-4), 7-5 अशा सरळ सेट्समध्ये दोन तासांच्या कालावधीत पराभव करत जेतेपद स्वतःकडे राखले. अमेरिकेचा राजीव राम आणि ब्रिटनचा सॅलिसबेरी यांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱया निटो एटीपी अंतिम स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.