मतमोजणी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त : अनेक गटांची सत्ता स्थापण्याची तयारी सुरु
प्रतिनिधी / पणजी
राज्यात बुधवारी झालेल्या पंचायत निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी प्रत्येक तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होणार असून एकूण 5038 उमेदवारांचे भवितव्य समोर येणार आहे. अनेक मंत्री, आमदार तसेच राजकीय पक्षांची परीक्षाही पंचायत निवडणुकीच्या निकालांतून दिसून येणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार असल्यामुळे सर्व निकाल हाती येईपर्यंत संपूर्ण दिवस जाणार अशी चिन्हे दिसत आहेत. अनेक वॉर्डातून बहुरंगी लढती झाल्या असून विजयी होणारे उमेदवार किरकोळ मतांनी निवडून येण्याची किंवा हरण्याची शक्यता दिसून येत आहे. तिसवाडी तालुक्यातील पंचायत निवडणूक मतमोजणी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. अनेक महिला उमेदवारांनी या पंचायत निवडणुकीत उत्साह दाखवला असून महिला मतदार जास्त असल्यामुळे त्यांची मोठय़ा संख्येने निवड होण्याची चिन्हे दिसत आहेत.
एकूण 1464 पदांसाठी 5038 जण रिंगणात
एकूण 1464 वॉर्डात ही निवडणूक झाली आणि त्यासाठी 5038 उमेदवार रेंगणात होते. या हिशोबाने प्रत्येक वॉर्डात सरासरी 3 ते 4 उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. काही वॉर्डात दोन ते तीन तर काही वॉर्डात पाच ते सहा उमेदवारही आखाडय़ात होते. त्यापैकी मतदारांनी कोणाला कौल दिला आणि विजयी केले याचा फैसला आज मतमोजणीनंतर होणार आहे.
मतमोजणी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त
मतमोजणीच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवार त्यांचे पोलींग एजंट व पासधारकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. तालुका मामलेदार हे त्यासाठी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पहाणार आहेत.
अनेक गटांची सत्ता स्थापण्याची तयारी सुरु
पंचायत निवडणुकीचा निकाल लागताच सरपंच, उपसरपंच पदांसाठी रस्सीखेच आणि राजकारण सुरू होणार आहे. त्याकरीता विजयाची खात्री असलेल्या काही उमेदवारांनी आधीच गुडघ्याला बाशिंग बाधून तयारी केली असून काही मंत्री, आमदारांनी यापुर्वीच त्या पदांसाठी आपापले उमेदवार तयार ठेवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.