Tarun Bharat

पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची चारही पदे रिक्त

स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा : मनपाच्या 58 वॉर्डांची जबाबदारी एकाच अधिकाऱयावर

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी मनपातील पर्यावरण नियंत्रण विभागाकडे सोपविली आहे. याकरिता चार पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची आणि एक पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंत्याचे पद निर्माण करण्यात आले आहे. पण यापैकी एकाच पदावर अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरित साहाय्यक पर्यावरण अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

महापालिकेच्या 58 वॉर्डांमधील कचऱयाची उचल करणे, रस्ते झाडलोट करणे, गटारी व नाला स्वच्छ करणे अशा विविध जबाबदाऱया आरोग्य विभागाकडून सांभाळल्या जातात. यापूर्वी स्वच्छतेच्या कामकाजाची आणि देखभालीची जबाबदारी आरोग्य अधिकाऱयांकडे होती. मात्र, महापालिका कर्मचारी बढती आणि बदलीची नियमावली लागू झाल्यानंतर यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. स्वच्छतेच्या कामाचा भार सांभाळण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे. आरोग्य अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण नियंत्रण विभाग कार्यरत आहे.

58 वॉर्डांच्या कामाची जबाबदारी साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडेच 

पर्यावरण नियंत्रण विभागासाठी पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते आणि चार पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. प्रारंभी या पदावर केवळ पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांचीही नियुक्ती केली होती. महापालिकेत तीन पर्यावरण साहाय्यक अभियंते आणि एक पर्यावरण साहाय्यक अभियंते कार्यरत होते. मात्र एकामागोमाग तिन्हीही पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची बदली अन्यत्र झाली आहे. त्यामुळे सध्या पूर्ण 58 वॉर्डच्या कामाची जबाबदारी केवळ साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे सोपविण्यात आली आहे.

स्वच्छता कामकाजाचा बोजवारा

तीन पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांकडे प्रत्येक 20 वॉर्डांची जबाबदारी देऊन स्वच्छतेबाबत देखभाल करण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते का? व रस्त्याशेजारी टाकण्यात आलेल्या कचऱयाची उचल केली आहे का? याची पाहणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्याचप्रमाणे स्वच्छतेसंदर्भातील नियमावलीचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करणे व प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणे अशा विविध जबाबदाऱया साहाय्यक अभियंत्यांकडे सोपविण्यात आल्या होत्या. मात्र, आता महापालिकेत पर्यावरण साहाय्यक अभियंते नसल्याने स्वच्छतेच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छतेच्या तक्रारींची दखल घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कचऱयाची उचल वेळेवर होत नसल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. केवळ एका अभियंत्याकडे संपूर्ण 58 वॉर्डांच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने स्वच्छतेची कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रिक्त असलेली पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची पदे कधी भरणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

बदलीमागचा उद्देश काय?

महापालिकेतील एका पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती अथणी तालुक्यातील नगरपंचायतीमध्ये केली आहे. जिल्हय़ाधिकाऱयांच्या आदेशानुसार त्यांची बदली अन्यत्र झाली असली तरी वेतन महापालिकेतून दिले जाते. त्यामुळे कामकाज अन्यत्र आणि पगार महापालिकेचा अशी स्थिती निर्माण झाली आहे. मनपामध्ये अधिकाऱयांची कमतरता असताना अन्यत्र बदली करण्यामागचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

Related Stories

बेळगाव भूषण समाजसेवा पुरस्कारांचे वितरण

Patil_p

बी. आय. पाटील यांना वाघवडे येथे श्रद्धांजली

Omkar B

सुरेश नागोजीचे यांचा कल्लेहोळमध्ये सत्कार

Amit Kulkarni

महालक्ष्मी कोविड सेंटरला अनेकांचे आर्थिक सहाय्य

Omkar B

विकेंड कर्फ्यूला निपाणी व्यवहार ठप्प

Patil_p

शहर परिसरात जागतिक महिला दिन उत्साहात

Amit Kulkarni