Tarun Bharat

अष्टपैलू बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमधून निवृत्त

2019 वर्ल्डकप फायनल हिरोच्या देदीप्यमान कारकिर्दीची सांगता

लंडन / वृत्तसंस्था

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू व 2019 वर्ल्डकप फायनलमधील हिरो बेन स्टोक्सने सोमवारी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत राहणे असहय़ होत असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्याने याप्रसंगी नमूद केले. 31 वर्षीय स्टोक्स आज (मंगळवार दि. 19) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामना डरहॅम येथे खेळेल आणि येथेच त्याच्या वनडे कारकिर्दीचा समारोप होईल.

3 वर्षांपूर्वी लॉर्ड्स येथे संपन्न झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप फायनलमध्ये सामना जिंकून देणारी खेळी साकारली, हे स्टोक्सच्या वनडे कारकिर्दीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. त्याच्या 84 धावांच्या धमाकेदार खेळीमुळे सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचला आणि त्यानंतर इंग्लंडने वनडे क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले विश्वचषक जेतेपद संपादन केले.

कसोटी क्रिकेटमध्येही नेतृत्वाची धुरा सांभाळत असलेल्या स्टोक्सने 104 वनडे सामन्यात 2919 धावा केल्या, तसेच 74 बळी घेतले आहेत. ‘मंगळवारी मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहॅम येथे शेवटचा सामना खेळेन. या क्रिकेट प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेणे कठीण होते. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करत असताना संघसहकाऱयांसमवेत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटू शकलो’, असे स्टोक्स निवृत्तीची घोषणा करताना म्हणाला.

आयर्लंडविरुद्ध वनडे पदार्पण

2011 मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे पदार्पण करणाऱया बेन स्टोक्सने या क्रिकेट प्रकारात 3 शतके झळकावली असून तो इंग्लंडच्या अव्वल अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो.

‘तिन्ही प्रकारात भरगच्च क्रिकेट खेळत असताना शरीराची तितकी साथ लाभत नाही, हे मला सातत्याने जाणवत होते. पण, त्याच बरोबर विद्यमान कर्णधार जोस बटलर आणि त्याच्या सहकाऱयांना साथ देऊ शकेल, अशा आणखी एका युवा खेळाडूची जागा अडवत आहोत, अशी माझी भावना होती. मी मागील 11 वर्षे जे योगदान देऊ शकलो, तसे योगदान देण्याची संधी ताज्या दमाच्या खेळाडूंना उपलब्ध करुन द्यावी, हा माझा मानस आहे. यापुढे, कसोटी क्रिकेटमध्ये शक्य तितके योगदान देण्यासाठी मी निर्धाराने खेळत राहीन. शिवाय, टी-20 क्रिकेटमध्येही पूर्ण ताकदीने खेळेन’, असे स्टोक्स पुढे म्हणाला. याप्रसंगी त्याने जोस बटलर, मॅथ्यू मॉट व अन्य सर्व सहकाऱयांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘डरहॅममध्ये घरच्या मैदानावर समारोपाचा सामना खेळणे खास असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील’. याचा त्याने शेवटी उल्लेख केला.

कोट्स

‘प्रत्येक क्रिकेट प्रकारात बेन स्टोक्स आमच्यासाठी सुपरस्टार ठरत आला आहे. 2019 वर्ल्डकप फायनलमध्ये त्याच्या लक्षवेधी योगदानामुळेच इंग्लंडला ऐतिहासिक जेतेपद संपादन करता आले. बेन स्टोक्स केवळ जागतिक स्तरावरील सर्वोत्तम खेळाडू नव्हे तर प्रेरणास्थानही ठरत आला. वनडेमध्ये त्याची उणीव जरुर जाणवेल. पण, कसोटी नेतृत्व आणि भरगच्च क्रिकेटमुळे सर्व बाबी हाताळणे कठीण असते, हे आम्ही समजू शकतो. त्याच्या निर्णयाविषयी आम्हाला आदर आहे’

-ईसीबीचे अंतरिम सीईओ क्लेअर कॉनर

Related Stories

हार्दिक सिंग, सविता पुनिया सर्वोत्तम हॉकीपटू

Patil_p

अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाला कठीण ड्रॉ

Patil_p

झंझावात धोनीचा, विजय मात्र केकेआरचा!

Patil_p

शेफिल्ड युनायटेड खेळाडूंची वेतन कपातीला मान्यता

Patil_p

दुसऱया सामन्यात भारताची कतारवर मात

Patil_p

वनडे मालिकेत इंग्लंड संघाची विजयी सलामी

Amit Kulkarni