दुबई / वृत्तसंस्था
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ाने आयसीसी टी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकन यादीत पाचव्या स्थानी झेप घेतली. आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध सलामी लढतीत पंडय़ाने गोलंदाजीत 25 धावात 3 बळी व 17 चेंडूत नाबाद 33 धावा, असे योगदान दिले होते. त्याचे प्रतिबिंब ताज्या मानांकन यादीत उमटले. अफगाणने लंकेला हरवत आशिया चषक स्पर्धेची दिमाखात सुरुवात केली असून त्याचे प्रत्यंतर मानांकनातही आले. रशिद खान गोलंदाजांच्या यादीत 708 गुणांसह तिसऱया स्थानी राहिला. आदिल रशिद व ऍडम झाम्पा हे लेगस्पिनर्स अव्वल राहिले.
फलंदाजीच्या आघाडीवर बाबर आझम (810 गुण) व मोहम्मद रिझवान (796) पहिल्या दोन क्रमांकावर विराजमान असून अफगाणचा हझरतुल्लाह झॅझाईने 26 चेंडूत 23 व 28 चेंडूत 37 अशा दोन खेळींसह 14 वे स्थान प्राप्त केले. त्याच्या खात्यावर सध्या 611 गुण आहेत.
कसोटी मानांकन यादीत बेन स्टोक्स फलंदाजीत 18 व्या, गोलंदाजीत 38 व्या तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱया स्थानी राहिला. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा 384 गुणांसह अव्वल स्थानी आहे. वनडे मानांकनात फारसे मोठे बदल झालेले नाहीत.