वृत्तसंस्था /लंडन
इंग्लंडच्या क्रिकेट क्षेत्रात भरीव योगदान देणारा अष्टपैलू मोईन अलीचा ‘ओबीई’ बहुमान (ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर) देवून गौरविण्यात आले. 34 वर्षीय मोईन अलीने आपल्या 16 वर्षांच्या व्यावसायिक क्रिकेट कारकीर्दीमध्ये दर्जेदार कामगिरी केल्याबद्दल त्याचा हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
ब्रिटनच्या राणींचा बुधवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ब्रिटन शासनातर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव केला जातो. अष्टपैलू मोईन अलीने गेल्यावर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 64 सामन्यांत फलंदाजीत 2914 धावा तर गोलंदाजीत 195 बळी मिळविले. या कामगिरीबद्दल ब्रिटीश शासनातर्फे त्याचा गौरव करण्यात आला. इंग्लंडच्या वनडे संघामध्ये अद्याप मोईन अली महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मोईन अलीने किमान 200 सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. मोईन अलीने ब्रिटीश शासनाचे आभार मानले आहेत.