डॉ. आंबेडकर जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : पणजीतील राज्यस्तरीय सोहळय़ात अभिवादन
प्रतिनिधी / पणजी
मागासवर्गीय लोकांसाठी समाजकल्याण खात्याच्या कित्येक योजना आहेत, मात्र त्या लालफितीत अडकल्या असून येत्या वर्षभरात या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील. या योजनांपासून एकही मागासवर्गीय गोमंतकीय वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पणजीत कदंब बसस्थानकाजवळीक आंबेडकर उद्यानात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासमवेत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रविण आर्लेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, शंभू भाऊ बांदेकर आदींची उपस्थिती होती.
देश, वंचितांसाठी महान कार्य
बाबासाहेबांचे विचार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा विकास करणे हे सरकारचे ध्येय असून त्यांच्याच विचारातून प्रेरणा घेऊन या समाजातील मागासलेपण पुसून टाकण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. बाबासाहेबांनी देश आणि वंचितांसाठी केलेले कार्य महान असल्याचे गौरवोद्गारही डॉ. सावंत यांनी काढले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.
पर्वरीत वर्षभरात आंबेडकर भवन
पर्वरीत नियोजित आंबेडकर भवन उभारण्यासाठीची जागा समाजकल्याण खात्याकडे सुपूर्द केली असून येत्या वर्षभरात तेथे भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अत्याधुनिक सोयींनी युक्त असणाऱया या भवनात सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह वसतिगृह आणि अन्य सोयी असतील, अशी माहिती त्यांनी दिली.
आंबेडकरांचे योगदान जपणार : नाईक
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांचे प्रचंड यश आणि राष्ट्राप्रती दिलेले योगदान नेहमीच जपले जाईल आणि चांगला आणि सुसंवादी समाज घडविण्यासाठी नवीन पिढीला मार्ग दाखवतील, असे सांगितले.
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी वंचित घटकांना मदत करण्यासाठी समाजकल्याण खाते विविध कल्याणकारी योजनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी परिश्रम करणार असल्याचे सांगितले.
पुणे येथील प्रमुख वक्ते गिरीश मोरे यांनी डॉ. आंबेडकरांचे कार्य केवळ दलितांच्या उन्नतीपुरते मर्यादित नाही, तर त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र, कृषी, परराष्ट्र व्यवहार इ. क्षेत्रातील प्रमुख धोरणांचा प्रचार करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले.
पाच जणांना पुरस्कार प्रदान
चंद्रकांत हळर्णकर, लक्ष्मण गांवकर, नारायण खोर्जुवेंकर, नरसिंह परवार, दिलीप पेडणेकर यांनी समाजासाठी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा डॉ आंबेडकर सामाजिक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्त विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाज कल्याण सचिव अरुणकुमार मिश्रा, आयएएस यांनी स्वागत केले. पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती मामू हागे आयएएस, समाज कल्याण संचालक सिध्दीविनायक नाईक हे यावेळी उपस्थित होते. गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी यांनी आभार मानले.