Tarun Bharat

सगळा मायेचा पसारा

अध्याय चोविसावा

संपूर्ण विश्व निर्गुण निराकार ईश्वराने व्यापलेलं आहे मग त्यात इतरांना जागा कुठून असणार? ही बाब माहीत असूनसुद्धा काही लोक हे जग प्रकृती आणि पुरुष यांनी मिळून तयार केलं आहे असे अज्ञानापोटी सांगत असतात. यात अज्ञान असं म्हणायचं कारण म्हणजे प्रकृती आणि पुरुष ही मायेचीच निर्मिती आहे आणि माया परमेश्वराच्या अधिकाराखाली काम करते. यातील प्रकृती ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार या आठ घटकातून तयार होते तर पुरुष म्हणजे जीव हा परा म्हणजे न दिसणाऱया मायेतून तयार होतो. जोपर्यंत त्याच्या मनात आहे तोपर्यंत हा दोन्ही प्रकारच्या मायेचा खेळ चालू असतो. ही सर्व ईश्वरी लीला असल्याने , समोर दिसत असले तरी प्रत्यक्षात खरी नसलेली गोष्ट अज्ञानी लोक अगदी खरी असल्याप्रमाणे सांगतात. त्याला बळकटी यावी म्हणून पुढे सांगतात की, ज्याप्रमाणे अर्धनारीनटेश्वराच्या मूर्तीत जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे संसारांत प्रकृति आणि पुरुष एकरूपानेच नांदत असतात. तो पुरुष आणि ती पतिव्रता ह्या दोघांची एकात्मभावाने अत्यंत प्रीति आहे. पुरुष सदोदित तिच्या आधीन होऊन राहतो. मग हा तिच्याच डोळय़ांनी पाहातो, तिच्याच तोंडाने बोलतो, तिच्यामुळेच हा सुखदुःखे भोगतो, तिच्यामुळेच बंधमोक्ष भोगतो तिच्यामुळेच ‘मी ब्रह्म’ असे म्हणवितो, तिच्यामुळे हा कर्माकर्म करतो आणि तिच्यामुळेच हा धर्माधर्माच्या परिणामाप्रमाणे मरण आणि जन्म भोगतो. तिच्यामुळेच याला पातक घडते, तिच्यामुळेच याला पुण्य मिळते, तिच्यामुळेच हा महत्त्वाला चढतो आणि तिच्यामुळेच अधःपाताने पडतो. त्या दोघांनी तिसरेपणाचा संपर्क न होऊ देता अनेक लोक उत्पन्न केले. त्यासाठी व्यभिचार केला आणि संसार वाढविला.

पुरुष आपलीच शक्ति जी प्रकृति तिच्या संगतीने शिवपणाचे सारे सोहळे भोगतो आणि त्याची प्रिया त्याला क्षणभरही दिसली नाही तरी तो आपले सर्व शिवत्व सोडून देतो. ज्याला गाव नाही , ठाव नाही, जिवाचे ठिकाण नाही, रूप नाही, नाव नाही, काळ नाही, वेळ नाही, असा हा असतानाही प्रकृतीने केवळ आपल्या गुणांनीच त्याला प्रबळ केले आहे. प्रकृतीने आपल्या गुणांनीच वर्ण, व्यक्ति, रूप, नाव, इत्यादि नानाप्रकारच्या वैभवविलासांनी आपल्या पतीला स्वरूप दिले. सर्व त्रिभुवन पाहिले असता तिसरे अंग दृष्टीस पडत नाही. प्रकृति आणि पुरुष या दोघांनीच जग गजबजून गेले आहे. दोघांच्या मिलाफानेच ते सुंदर रीतीने भरून राहिले आहे. पति नसेल तर ती पतिव्रता निखालस नाहीशीच होऊन जाईल आणि पति आपल्या स्त्रीशिवाय असून नसल्यासारखाच होईल. तो वास्तविक काही न होताच पति झाला आहे. खरोखर शिव म्हंटला म्हणजे जो सदोदित निःसंग, केवळ कोणतेही कर्म न करणारा असा असतो. परंतु त्याची श्री आपल्या प्रेमपाशाने त्यालाही वश करून घेऊन अनेक सुखदुःखांचा त्रासही भोगावयास लावते. याप्रमाणे प्रकृतीने आपला नवरा गृहाचारात गुंतवला असून ती त्याच्यावर प्रपंचाचा अधिकार गाजवू लागते. प्रकृति ही पतिव्रता असून ती नवऱयाशी मुळीच प्रतारणा करत नाही. ती अनेक कर्माकर्माचे कष्ट सोसून अनेक प्रकारची सुखदुःखे आपल्या पतीला अवश्य देते. आणखी आश्चर्य ते काय सांगू? बायको जे मिळवील तेच नवरा खातो. कारण असे पाहा की, तिच्याशिवाय त्याला एक कवडीसुद्धा मिळत नाही. प्रकृति ही पतिव्रतांमध्ये अगदी श्रे÷ आहे. तिने आपल्या गुणांनीच आपल्या पतीला वश केले आहे. आणि रात्रंदिवस ती सुगरण नवऱयाला सूक्ष्म वासनातंतुरूप शेवया सेवन करायला लावते. जेव्हा प्रकृतीच्या धाकाने तोही संसारसमुद्रामध्ये जलक्रीडा करू लागतो, तेव्हा प्रकृति ही बळानेच पुरुषाला त्यात बुडविते. एकादे वेळी पुरुषही प्रकृतीला बुडवितो. अशा प्रकृतीच्या संगतीमध्ये पुरुषाच्या मागे पंचमहाभूते लागतात, तेव्हा तो साकार होऊन जन्ममरणांच्या फेऱयात अडकतो. असा प्रकृतीच्या भिडेने पुरुष हा केवळ वेडा बनला आणि बिचारा आपले मूलरूप विसरून गेल्यामुळे प्रकृतीने त्याला अत्यंत दीन बनवले. ह्याप्रमाणे पूर्णपणाला विसरून जाऊन जीव आणि शिवाचे भेद तो स्वतःच सोशीत बसतो. त्याला पुन्हा आपल्या मूळस्वरूपात न्यावयाला गुरुराज हाच पूर्णपणे कुशल आहे.

Related Stories

सत्वगुणाची वाढ करून रज आणि तम गुण नाहीसे करता येतात

Patil_p

गोव्यातील ऊस शेतीला अद्याप ठोस पर्याय नाही

Patil_p

गुजरातमध्ये काय होणार ?

Patil_p

‘डब्ल्यूएचओ’ची पटकथा!

Patil_p

अभिजात टेनिसपटू

Patil_p

भ्रष्टाचाराचे टक्के अन् दंगलीचे टोणपे

Amit Kulkarni