सभापती तवडकरांनी दिलेली वागणूक अशोभनीय
प्रतिनिधी/ काणकोण
आमोणे, पैंगीण या ठिकाणी होणाऱया लोकोत्सवाला यंदा देशाच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू उपस्थित राहणार असल्यामुळे त्यापूर्वी पर्तगाळी ते आमोणेपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी ही एकच मागणी नव्हे, तर गोव्याच्या विविध भागांतील रस्त्यांच्या सुधारणेसंबंधी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन दिले होते. हे आपले काम मागच्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. मात्र या प्रकाराने संतापलेल्या सभापती रमेश तवडकर यांनी आपल्याला श्रीस्थळच्या सरकारी विश्रामधामात बोलावून घेऊन भाजप कार्यकर्ते, काणकोणचे पंच तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत आपल्याला जाब विचारला. एवढेच नव्हे, तर आपल्याला उलटी उत्तरे दिली, असा आरोप काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार जनार्दन भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. विद्यमान सभापती रमेश तवडकर हे जरी निवडून आलेले असले, तरी या मतदारसंघात केवळ 30 टक्के इतकीच मते त्यांना मिळाली आहेत. उर्वरित 70 टक्के मतदारांचेही प्रतिनिधी म्हणून ते आता काम करत आहेत. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी एका विरोधी गटाच्या प्रतिनिधीला वागणूक दिली ती सभापतीपदाला शोभण्यासारखी नाही. लोकोत्सव हा समस्त जनतेचा आणि सरकारी निधीने होणारा महोत्सव असताना सदर महोत्सव हा आपला आहे, राष्ट्रपतींना आपण बोलावतो, रस्ते आपण बनविणार अशी वक्तव्ये करून एक प्रकारे हा महोत्सव स्वकेंद्रीत ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे, अशी टीका भंडारी यांनी केली.
काणकोण भाजपकडून इन्कार
दरम्यान, काणकोण मतदारसंघात सभापती रमेश तवडकर यांनी जी कामे सुरू केली आहेत त्यांचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न जनार्दन भंडारी यांच्याकडून चालू असून सभापतींसमोर भंडारी उंच स्वरात बोलत होते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा अपमान केलेला नाही, असे काणकोण भाजप मंडळाने श्रीस्थळ येथील सरकारी विश्रामधामात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, महेश नाईक, दिवाकर पागी, विनय तुबकी, संजीव तिळवे, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई व श्रीस्थळचे पंच राजेश वेळीप उपस्थित होते.
गोवा फॉरवर्डकडून निषेध
सभापतीपदी निवड झाल्यानंतर पक्षाचा राजीनामा देण्याची गोव्यात कित्येक उदाहरणे आहेत. मात्र सध्याचे सभापती हे केवळ भाजपाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहातात. हे लोकशाहीला घातक आहे. गोव्यात मागच्या दहा वर्षांत भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे मागच्या दहा वर्षांत काणकोणचा विकास न होण्यास भाजपच जबाबदार आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डच्या विकास भगत यांनी काणकोण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आणि सभापती रमेश तवडकर यांच्या कृत्याचा निषेध करत असल्याचे जाहीर केले. यावेळी काँग्रेसचे क्लेस्टन व्हिएगश, वैष्णव पेडणेकर उपस्थित होते.
सभापती हे सर्वोच्च असे पद आहे, याकडे भगत यांनी लक्ष वेधले. सध्या भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून सुडाचे राजकारण चालू आहे. त्याच्या विरोधात आणि काणकोणवासियांवर होणाऱया अन्यायाविरुद्ध विरोधी गट संयुक्तपणे लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण करू नका. अहंकाराने माजलेल्या व्यक्तींचा नाश झाल्याची उदाहरणे इतिहासात आहेत. ‘काणकोण व्हिजन अँड मिशन’च्या आवाहनास अनुसरून सर्व विरोधी गट एकत्र आले होते. मात्र या ठिकाणी विरोधी गटांची मुस्कटदाबी केली जात आहे. विकासाच्या नावाखाली राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्याविरुद्ध एकसंधपणे लढा देणार, असे भगत यांनी स्पष्ट केले. यावेळी सभापतींसमोर जी चर्चा झाली त्यासंबंधी पेडणेकर आणि व्हिएगश यांनी माहिती दिली.