Tarun Bharat

वाळू व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या

खानापूर तालुक्यातील व्यावसायिकांची मागणी

प्रतिनिधी /खानापूर

तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून बेकायदा वाळू उपसावर निर्बंध घालण्यात आले असून बेकायदा वाळू उपसा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाळू व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर आर्थिक संकट उद्भवले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे हा वाळू उपसा बंद करण्यात आल्याने या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी आम्हास निर्बंध घालून स्वत:च्या शेतातील वाळू उपसा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वाळू व्यावसायिकांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.

येथील विश्वकर्मा मंदिरात वाळू व्यावसायिकांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रमोद सुतार म्हणाले, माजी लोकप्रतिनिधींनी एका कार्यक्रमात बोलताना वाळू व्यावसायिक लोकप्रतिनिधींना आर्थिक रसद पुरवितात. त्यामुळे बेकायदा वाळू व्यवसाय जोरदार सुरू असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. यानंतर वाळू व्यवसाय बंद करण्यात आला होता. वाळू व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच याचा परिणाम वीट व्यवसायावरही झाला आहे. वीट उत्पादनाला वाळूचा भुसा लागतो. यासाठी आता तातडीने वाळू व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे.

वीट व्यवसायावर तालुक्यात हजारो कुटुंबांची गुजराण होते. वीट उत्पादनासाठी परगावाहून अनेक कामगार येतात. भुसा उपलब्ध झाला नसल्यास हे कामगार परत जाणार आहेत. त्यामुळे वीट व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे वाळू व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करावा लागत आहे. आजतागायत आम्ही कोणत्याही आमदार अथवा लोकप्रतिनिधींना वाळू उपशासाठी आर्थिक देवाण-घेवाण केलेली नाही. यामुळे माजी आमदारांनी केलेला आरोप खोटा असून त्यांनी राजकीय हेतूपुरस्सर हा आरोप केला आहे. या आरोपात आमचा कोणताही संबंध नसल्याचे विनायक पाटील यांनी सांगितले. वाळू व्यावसायिकांना स्वत:च्या जागेत वाळू उपशासाठी निर्बंध शिथिल करून परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी तोईद चांदकण्णावर, नारायण घाडी, मऱ्याप्पा पाटील, प्रदीप घाडी, जोतिबा पाटील, परशराम शिवठणकर, विनायक पाटील, राजू गोरल, जोतिबा पाटील, विलास पाटील, पांडुरंग गोरल, मंगेश पाटील, शंकर कदम, यशवंत देसाई, आत्माराम शिवठणकर, परशराम शिवठणकर, नारायण चौगुले यासह इतर व्यावसायिक उपस्थित होते. 

Related Stories

जि.पं.अध्यक्षा आशा ऐहोळे यांचा पाहणी दौरा

Patil_p

बेजबाबदार बसचालकांवर नियंत्रण कोण ठेवणार?

Amit Kulkarni

केंद्रीय राज्यमंत्री सोमप्रकाश यांची भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाला भेट

Amit Kulkarni

संगोळ्ळी रायण्णा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सुरूच

Patil_p

जमखंडीत परिवहन कर्मचाऱयांना लसीकरण

Patil_p

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाबाबत चर्चा

Amit Kulkarni