नगर नियोजन खाते संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /पणजी
राजधानी पणजीसह मडगाव, फोंडा, म्हापसा या शहरांचे बाहय़ विकास आराखडे (ओडीपी) नव्याने करण्याचे नगर नियोजन खात्याने ठरविले आहे. खात्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय ऐतिहासिक वारसा स्थळांभोवती 100 मीटर ‘बांधकाम विरोधी बफर झोन’ अधोरेखित करण्याचेही ठरवण्यात आले आहे.
नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन ते नवे ओडीपी तयार करण्यात येणार आहेत. खात्याने नियोजन सल्लागारांची नेमणूक केली असून संचालक मंडळातर्फे नवीन ओडीपी तयार करताना त्यांची सेवा वापरात आणण्यात येणार आहे. भाडे तत्वावरील जमीन, खासगी जमीन व सखल भागातील जमिनीचे रुपांतर न करण्याचे ठरवण्यात आले आहे.
वारसा स्थळाभोवती 100 मी.अंतरावर बांधकामास बंदी
खात्याने अनेक ओडीपी 60 दिवसांसाठी स्थगित केले असून त्या करीता 2021 चा प्रादेशिक आराखडा लागू केला आहे. ओल्ड गोवा सारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्या भोवती 100 मीटसचा भाग बांधकाम प्रतिबंधक विभाग म्हणून बफर झोन करण्यात येणार आहे. प्रादेशिक आराखडा 2021 मध्येही तसा झोन अधोरेखित करण्यात आला नव्हता, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे आता वारसा स्थळांभोवती 100 मीटर्स अंतरावर कुठेच बांधकाम करता येणार नाही.
स्थगित ओडीपींमध्ये अनेक त्रुटी स्थगित ठेवण्यात आलेल्या ओडीपीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असून काही जमिनींचे रुपांतरही चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे खात्याने नेमलेल्या समितीच्या निदर्शनास आले आहे. ती सर्व दुरुस्ती करण्याऐवजी ते ओडीपी नव्यानेच करण्याचे खात्याने ठरविले आहे.