Tarun Bharat

मुंबईसह विधानसभेचीही निवडणूक लावा

Advertisements

उद्धव ठाकरेंनी ललकारले ः भाजपचे नेते अमित शहांनाच आवाहन

प्रतिनिधी/ मुंबई

‘हिमत असेल तर महिन्याभरात मुंबई पालिकेसह विधानसभेच्या निवडणुका लावा’, असे आवाहन देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच ललकारले आहे. पदाधिकारी मेळाव्यात अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना टीकेचे लक्ष्य केले. तसेच सडकून टीकाही केली. तर शिंदे गटाची ‘मिंधे गट’ अशी संभावना करत टीकेची झोड उठवली. अनेक मुद्यांवर बोलताना त्यांनी फडणवीस यांची मुंबईतील ही शेवटची निवडणूक ठरवा असे आवाहन करताना सर्व शिवसैनिकांनी आपली पहिली निवडणूक समजून लढाई सुरु करावी, असे आदेश दिले. त्यांच्या एकूणच भाषणावरुन त्यांनी मुंबईचे विषयच अधिक हाताळल्याने मनपासाठी रणशिंगच फुंकल्याचे जाणवून आले. त्याचबरोबर दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असेही ठामपणे सांगितले.

पदाधिकाऱयांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार डावपेच आखत असले तरी त्यांना यश मिळणार नाही, कोणतेही डावपेच यशस्वी होणार नसल्याचे स्पष्ट केले. आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचे हिंदुत्व म्हणजे काय हे सर्वांना कळत आहे. केवळ मराठीच नव्हेतर हिंदू सोबत उत्तर भारतीय, गुजराती सर्व आमच्या सोबत आहेत, याचीही त्यांनी आठवण करुन दिली. मी अमित शहा यांना आव्हान देतोय, तुमचे कोणतेही डावपेच येथे यशस्वी होणार नाहीत. कुस्ती आम्हालाही येते, तीच आमची परंपरा आहे. कोण कोणाच्या पाठीला माती लावतो ते कळेलच, असे आव्हान दिले.

शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट

उद्धव ठाकरे भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा थेट उल्लेखच टाळला. शिंदे यांचा उल्लेख त्यांनी मिंधे गट असा केला. त्यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, त्यांचा गट म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, असा आहे. मिंधे गट नुसता होय महाराजा बोलत आहे…आज दिल्लीत गेले..तिथे ठणकावून सांगितले का, प्रकल्प का गेला? वेदांतला आता केंद्र सरकार सवलती देणार म्हणे, मग महाराष्ट्रात येणार होता तेव्हा का सवलती दिल्या नाहीत? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

मुंबईवर गिधाडे फिरत आहेत

मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिलशहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आले. पण ते मातीला मिळाले. आताही त्या कुळातील येऊन गेले. अमित शहा म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू. तुम्ही प्रयत्न कराच, तुम्हांला शिवसैनिक आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अशांचा कोथळा बाहेर काढू

मुंबई संकटात असते तेव्हा कुठे असता? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही येता. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे. या आईवर चाल करून येणाऱयाचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही, असा ठाकरी शैलीमध्ये दमही भरला.

मला माझ्या घराण्याचा अभिमान

संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील घडामोडी तुम्हांला माहित हव्यात. जनसंघ हा समिती फोडणारा, ही त्यांचीच औलाद आहे. पंचवीस वर्ष युतीत आमची सडली, कुजली. विनासायास यांना उपमहापौर पद मिळाले. मेहनत करायची शिवसैनिकांनी. वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे.. तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे घेतले भरले आहेत… वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुमचा वंश कुठला? असा सवाल करताना तुमची किती कुळे बावन की एकशे बावन्न अशी विचारणा केली.

फडणवीसांची शेवटची निवडणूक ठरवा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही शेवटची निवडणूक म्हणून लढा. होय ही तुमची शेवटचीच निवडणूक ठरेल, शिवसैनिक ती ठरवतील. पण आपण गाफील राहता कामा नये, आपल्याकडे काहीही नाही, गेलेले खासदार, आमदार गेल्या निवडणुकीत पडलेत. तिकडे आपल्याला भगवा फडकवायचाय. प्रत्येक शाखा शिवसेनेची शाखा, शिवसेना म्हणजे विश्वास, विकास, तिकडे गटप्रमुख असलेच पाहिजेत. अनेक काम आपण केली आहेत, ती पोचवायची आहेत. म्हणून आपली पहिली निवडणूक म्हणून लढा.

Related Stories

बाबरी विध्वंस अपघात; कट नव्हे!

Omkar B

काँग्रेस खासदाराच्या भावाचा अकाली दलात प्रवेश

Patil_p

सोनू सूदची बहिण लढणार विधानसभा निवडणूक

datta jadhav

शेतकरी घरी परतल्याच्या अफवा; मागण्या मान्य होईपर्यंत कुठेही जाणार नाही

datta jadhav

‘नंदीग्राम’प्रकरणी सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर

Amit Kulkarni

दिल्ली आग : अद्याप 35 बेपत्ता

Patil_p
error: Content is protected !!