प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव शहराची नेहमीच बदनामी झाली ती मोती डोंगरावरील बेकायदा झोपडपट्टीमुळे. ही झोपडपट्टी नेहमीच चर्चेत राहिली ती गुन्हेगारीमुळे. या झोपडपट्टीत सुमारे 800 घरे व तीन ते साडेतीन हजार मते असल्याने या झोपडपट्टीला नेहमीच अभय मिळत आले आहे. ही झोपडपट्टी बेकादेशीर आहेत. पण, तिच्यावर कारवाई करण्याचे धाडस मात्र, आजवर कोणीच केलेले नाही.
मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी बायणातील झोपडपट्टी (वेश्यावस्ती) जमीनदोस्त करण्याचे धाडस दाखविले होते. त्याचप्रमाणे मडगावच्या मोतीडोंगरावरील झोपडपट्टी जमीनदोस्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती. मडगाव शहराला या झोपडपट्टीपासून मुक्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. कारवाईचा दिवसही नक्की केला होता. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करतानाच तसेच सैन्याची मदत घेण्याचे नक्की केले होते.
पर्रीकर हे कारवाई करणार असल्याची माहिती कुठून तरी मोतीडोंगरावर पोहचली आणि या कारवाईला थेट न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. तेव्हापासून या झोपडपट्टीला कुणी हात लावू शकलेला नाही. त्यानंतर ही बेकायदेशीर वस्ती पाडावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केल्यानंतर पालिका प्रशासन-संचालकानी ही वस्ती पाडण्याचे आश्वासन न्यायालयाला देऊनही ही वस्ती 10 वर्षे उभी आहे.
मोतीडोंगर हा मुळात कोमुनिदादची जागा असल्याचे सांगितले जात आहे. ही जागा कोमुनिदादने पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यात कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. सुरुवातीला गोव्यात काम मिळविण्यासाठी आलेल्या मजूर लोकांनी या ठिकाणी झोपडय़ा बांधल्या. आता तर या ठिकाणी सर्व धर्मातील लोक मुक्काम करीत आहेत. मोतीडोंगरावरील झोपडपट्टीत राहणारे लोक मडगावच्या बाजारपेठेत व खास करून गांधी मार्केटात व्यवसाय करतात. येथील महिला अनेकांच्या घरात मोलकरीण म्हणून काम करतात.
आज या झोपडपट्टीत एक मंदिर व मशिद उभी राहिली आहे. नगरपालिका निवडणूक व विधानसभा निवडणुकीत येथील लोकांचा पुरेपूर वापर केला जातो. या झोपडपट्टीत काही नेते मंडळी तयार झाली असून त्यांचे सर्व राजकीय पक्षाशी चांगले संब्ंाध आहेत. त्यामुळे या झोपडपट्टीला नेहमीच अभय मिळत आले आहे.
मोतीडोंगर येथील ही बेकायदा वस्ती येथील गुंडगिरीसाठी कुप्रसिद्ध होती. या वस्तीत दोन गट कार्यरत होते. या गटात नेहमीच वाद व हाणामारी व्हायची. पोलीस कारवाई करायचे. परंतु, कारवाई हा केवळ फार्स असायचा. 2008 साली या परिसरात एक तलवारी घेऊन आलेला ट्रक आढळून आल्यावर ही वस्ती पुन्हा चर्चेत आली होती. गेल्या काही वर्षात या ठिकाणी मोठे संघर्ष झालेले नाही. मात्र, एखादी घटना घडल्यास त्वरित मोठय़ा प्रमाणात जमाव एकत्र होत असतो. कोरोना महामारीच्या काळात देखील ही झोपडपट्टी चर्चेत आली होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दिगंबर कामत व बाबू आजगांवकर यांच्या दरम्यान, मोतीडोंगरावर संघर्ष झाला होता. मोतीडोंगरावरील मतदार आपल्या बाजूने राहतील असे बाबू आजगांवकर यांना वाटत होते. पण, येथील मतदार हे दिगंबर कामत यांच्याबरोबर कायम असल्याचे चित्र त्यादिवशी पहायला मिळाले.