पंचतरणी मार्गाने बाबा बर्फानीचे दर्शन घेणार भाविक
वृत्तसंस्था / जम्मू
अमरनाथ यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. शुक्रवारी अमरनाथ गुहेनजीक ढगफुटीची घटना घडल्यावर यात्रा तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली होती. भाविकांची तुकडी सोमवारी पहाटे 5 वाजता जम्मू येथील शिबिरातून अमरनाथसाठी रवाना झाली. जम्मू प्रशासनानुसार यावेळी भाविकांना पंचतरणी मार्गाने अमरनाथच्या पवित्र गुहेपर्यंत नेण्यात येणार आहे. याच मार्गाने भाविक पवित्र गुहेत शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतील.
यात्रामार्गात भाविकांना सुरक्षित पुढे जाण्याकरता सीआरपीएफचे जवान मदत करत आहेत. पहलगाम आणि बालटाल येथील शिबिराच्या पुढे कुठल्याही भाविकाला जाण्याची अनुमती नसल्याचे सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी सांगितले आहे. पवित्र गुहेनजीक झालेल्या ढगफुटीनंतरही अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱया भाविकांच्या उत्साहात घट झालेली नाही.
बचावकार्य सुरूच
अमरनाथमध्ये ढगफुटीमुळे आतापर्यंत 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. सैन्याने बचावकार्याच्या अंतर्गत आतापर्यंत 35 जखमींना एअरलिफ्ट केले आहे. तर 45 जण अद्याप बेपत्ता असून माउंटेन रेस्क्यू टीम त्यांचा शोध घेत आहे. सैन्याकडून बचावकार्य सुरूच आहे. यात्रामार्गातील अडथळे दूर करण्याचे कामही सैन्याकडून केले जात आहे.
ढगफुटीची घटना
अमरनाथ गुहेनजीक शुक्रवारी संध्याकाळी ढगफुटी झाली होती. ढगफुटीच्या घटनेवेळी गुहेनजीक 10-15 हजार भाविक होते. हजारो लोकांना पवित्र गुहेकडून सुरक्षित पंचतरणी येथे नेण्यात आल्याचे आयटीबीपीकडून सांगण्यात आले. ढगफुटीमुळे पर्वतांवरून आलेल्या वेगवान प्रवाहासोबत भाविकांसाठीचे तंबू आणि दोन ते तीन लंगर वाहून गेले. पावसामुळे पूर्ण भागात वेगाने पाणी साचले आणि अनेक लोक याच्या तावडीत सापडले. काही भाविक या प्रवाहात वाहून गेल्याची भीती आहे.