वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन याच्या नावावर एक नको असणारा विक्रम नोंदवण्यात आला आहे. एक लाख कोटी डॉलरची बाजार भांडवल गमावणारी जगातील पहिली सूचीबद्ध ऍमेझॉन कंपनी ठरली आहे. बुधवारी कंपनीचे समभाग 4.3 टक्क्यांनी घसरले. यासह, कंपनीचे बाजारमूल्य 879 अब्ज डॉलर्स राहिले. जुलै 2021 मध्ये, कंपनीचे बाजारमूल्य विक्रमी 1.88 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. यामध्ये विक्रमासाठी ऍमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू होती. मायक्रोसॉफ्टच्या बाजारमूल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विक्रमी पातळी गाठली होती.
अमेरिकेतील पाच टॉपच्या टेक कंपन्यांच्या बाजारमूल्यात यावर्षी सुमारे चार ट्रिलियन डॉलर्सची घट झाली आहे. ऍमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर कंपनी आहे. या वर्षी कंपनीचे शेअर्स जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 83.2 अब्ज डॉलरची घट झाली असून ती आता 109 अब्ज डॉलर झाली आहे.
रिलायन्सपेक्षा पाचपट जास्त
ऍमेझॉनचे बाजारमूल्य एक लाख कोटी डॉलरने घसरले आहे. भारतीय रुपयात पाहिले तर ही रक्कम सुमारे 81 लाख कोटी रुपये होते. ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्याच्या तुलनेत जवळपास पाच पट अधिक आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीचे बाजारमूल्य 1,738,128 कोटी रुपये आहे.