2022 ची यादी जाहीर : उद्योजक मुकेश अंबानी दहाव्या स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित मासिक फोर्ब्स यांनी 2022 सालासाठी बलाढय़ श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्स बिलेनियर लिस्ट 2022 मध्ये भारताचे प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी 90.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह यादीमध्ये दहाव्या स्थानावर राहिले आहेत. या यादीत भारताचे ते सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत.
भारतामध्ये श्रीमंतांच्या यादीमध्ये आता गौतम अदानी यांचेही नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. अदानी उद्योग समुहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये मागच्या वर्षी गतवर्षाच्या तुलनेमध्ये 40 अब्ज डॉलर्सची वृद्धी झाली आहे. त्यांची संपत्ती आता 90 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या यादीमध्ये एचसीएलचे शिव नाडर, सिरम इन्स्टिटय़ुटचे सायरस पुनावाला, डिमार्टचे राधाकिशन दमानी, लक्ष्मी मित्तल, सावित्री जिंदल, कुमार मंगलम बिर्ला, दिलीप सांघवी, उदय कोटक आणि सुनील मित्तल यांचाही समावेश आहे.
अब्जाधिशांच्या संख्येत वाढ
अब्जाधिशांच्या जागतिक यादीमध्ये भारतीयांचा वाटा चांगलाच वाढला आहे. या यादीत गेल्या वर्षभरामध्ये अब्जाधिश भारतीयांची संख्या 166 वर पोहोचली आहे. याआधी ती 140 होती. कोरोना व्हॅक्सीन बनविणाऱया सायरस पुनावाला यांच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षभरात दुप्पट वाढ झाली असल्याचेही यादीत दिसून आले आहे.