अमेरिकेकडून केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार : प्रकरणातील सर्व टॅक्सीचालकांचे परवाने होणार रद्द,शेवटी सरकारी ऍप टॅक्सीच होणार सुरु
विशेष प्रतिनिधी /पणजी
वास्कोतील टॅक्सी चालकांनी अमेरिकन पर्यटकांना घेऊन जाणाऱया बसला अडवून चालकाला दिलेली धमकी व घातलेली हुज्जत प्रकरण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकन दुतावासाने हे प्रकरण भारतीय केंद्रीय गृहमंत्रालयापर्यंत पोहोचविले आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत टॅक्सी ऍपला मान्यता घेऊन वाहतूक खात्यामार्फत ऍप टॅक्सी सुरू करण्याचा इशारा व्यक्त केला आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी वास्कोच्या प्रकरणात अडकलेल्या सर्व टॅक्सी चालकांचे परवाने रद्द केले जातील, अशी माहिती दिली. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक टॅक्सी ऍप व्यवसायिकांना गोव्यात व्यवसायासाठी परवाने दिले जातील, अशी रोखठोक भूमिका मांडली आहे.
वास्को टॅक्सी प्रकरणाची दखल गोवा सरकारला गंभीरपणे घेणे भाग पडले आहे. प्राप्त माहितीनुसार वास्कोतील प्रकरणाची नोंद घेत अमेरिकन दुतावासाने भारत सरकारच्या गृहमंत्रालयाला कळविले. त्यानुसार गोव्यातील घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने मिळविली. राज्या सरकारला आता या प्रकरणी गंभीर निर्णय घेण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्तीदिनी राज्यस्तरीय कार्यक्रमात टॅक्सीवाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
पर्यटन खात्याचे ऍप
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना सांगितले की आता सरकार याप्रकरणी गप्प बसू शकणार नाही. पर्यटन खात्यामार्फत एक टॅक्सी ऍप तयार केला असून बुधवारी होणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत तो मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. पर्यटन खात्याने जरी ऍप बनविला असला तरी त्याची अंमलबजावणी वाहतूक खात्यामार्फतच होईल. या ऍपमधून जो काही अतिरिक्त महसूल मिळणार तो पुन्हा टॅक्सी चालकांवरच पूर्णतः खर्च केला जाणार आहे.
दोघांनाही परवडेल असे भाडे दर
दिवसभरातून केवळ 1 भाडे मारून गप्प बसणाऱया टॅक्सी चालकांना आता अतिरिक्त भाडी मारावी लागतील. त्यात त्यांचा व पर्यटकांचा देखील फायदा आहे. शिवाय त्यांना परवडतील, पर्यटकांना परवडतील असेच दर रहातील. टॅक्सीच्या वाढत्या भाडय़ामुळे एखादी मिनी बस भाडेपट्टीवर घेणे पर्यटकांना परवडते तसे होऊ नये यासाठी देखील प्रयत्न आहे.
वास्को प्रकरणातील टॅक्सीवाल्यांचे परवाने रद्द
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की, वास्कोतील प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहे आणि आम्ही आता या प्रकरणात जे कोणी टॅक्सीवाले असतील त्यांच्या विरोधात कारवाई म्हणून त्या सर्वांचे परवानेच रद्द करणार आहोत.
वास्को प्रकरणाचा पर्यटनावर अत्यंत गंभीर परिणाम होत आहे. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे देखील या प्रकरणी आता गंभीरपणे कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे.
अद्याप 66 प्रवासी बोटी बंदरात येणार
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी तरुण भारतला सांगितले की, मुरगाव बंदरात आणखी 66 बोटी विदेशी पर्यटकांना घेऊन येणार आहेत. वास्को घटनेमुळे या रद्द होऊ नयेत यासाठी आम्हाला आता काही कडक निर्णय घेणे आवश्यक आहे. परवाच्या घटनेमुळे गोव्यातील पर्यटनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाहक बदनामी झालेली आहे. त्यामुळे आता गोवा सरकार फार सतर्क राहिलेले आहे, असे ते म्हणाले.