वृत्तसंस्था /सिडनी
युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत बुधवारी येथे अमेरिका, पोलंड तसेच ग्रीस आणि इटली यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. अमेरिका-पोलंड तसेच ग्रीस-इटली यांच्यात उपांत्य लढती होतील.
अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोने ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा 3-6, 7-5, 6-3 असा पराभव करत आपल्या संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. या सांघिक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने एकूण 15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. पूर्वी एटीपी चषक टेनिस स्पर्धा भरविली जात होती. आता 2023 च्या हंगामासाठी युनायटेड चषक मिश्र सांघिक स्पर्धा पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे.
अमेरिकेने ब्रिटनवर 3-1 अशी एकतर्फी आघाडी घेत उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले. या लढतीमध्ये अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने ब्रिटनच्या हॅरेट डर्टचा 57 मिनिटांच्या कालावधीत 6-2, 6-0 असा फडशा पाडला. तर दुसऱया एका एकेरी सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन किझने ब्रिटनच्या केटी स्वानवर 2-6, 6-3, 6-4 असा विजय मिळविला. मात्र, ब्रिटनच्या कॅमेरून नुरीने पुरुष एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिजवर 6-4, 5-7, 6-4 अशी मात केली होती.
पोलंडच्या इगा स्वायटेक आणि हुबर्ट हुरकेज या जोडीने मिश्र दुहेरीचा सामना जिंकताना इटलीच्या मुसेटी आणि रोसाटेलो यांचा 6-1, 6-2 असा पराभव केला. पोलंडने प्रतिस्पर्धी संघावर 3-2 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. ग्रीस आणि क्रोएशिया यांच्यातील लढतीत ग्रीसच्या सित्सिपसने क्रोएशियाच्या कोरिकवर 6-0, 6-7 (4-7), 7-5 असा विजय मिळविला. त्यानंतर क्रोएशियाने ग्रीसशी 2-2 अशी बरोबरी साधली. पण शेवटच्या मिश्र दुहेरीत सित्सिपस आणि मारिया सॅकेरी यांनी मार्टिग व गोझो यांचा 7-6 (8-6), 6-4 असा पराभव करत उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले.