वृत्तसंस्था/ सिडनी
आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेतर्फे पहिल्यांदाच येथे आयोजित केलेल्या युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद अमेरिकेने पटकावले. या स्पर्धेत अंतिम लढतीत अमेरिकेने इटलीचा 4-1 अशा फरकाने पराभव केला.
या लढतीतील रविवारी खेळविण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने इटलीच्या बेरेटिनीचा 7-6 (7-4), 7-6 (8-6) अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करून आपल्या संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. तत्पूर्वी या अंतिम लढतीतील दोन्ही एकेरीचे सामने अमेरिकेच्या जेसिका पेगुला आणि फ्रान्सेस टायफो यांनी जिंकले होते. अमेरिकन संघातील टेनिसपटूंनी दोन एकेरीच्या सामन्यात दर्जेदार कामगिरी केली. बेरेटिनी आणि फ्रिट्झ यांच्यातील या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही सेटस् ट्रायबेकरपर्यंत लांबले पण फ्रिट्झने आपल्या वेगवान सर्व्हिस आणि बेसलाईन खेळाच्या जोरावर बेरेटिनीचे आव्हान संपुष्टात आणले. हा सामना दोन तास 16 मिनिटे चालला होता. फ्रिट्झने फोरहँड फटक्यावर आपला निर्णायक विजय मिळवला.