कॅलिफोर्नियातील घटनेत 10 ठार, 19 जखमी ः चिनी नागरिक टार्गेटवर
कॅलिफोर्निया / वृत्तसंस्था
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये शनिवारी रात्री उशिरा सामूहिक गोळीबाराची घटना घडली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मॉन्टेरी पार्क परिसरात चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान पहाटे 3.30 वाजता गोळीबार झाला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाल्याचे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. तथापि, पोलिसांनी मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. काही सोशल मीडिया माध्यमांवर ही घटना वर्णभेदाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात स्थानिक अमली पदार्थांच्या तस्करीचाही संबंध असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान गोळीबाराची भीषण घटना घडली आहे. नववर्षानिमित्त तेथे हजारो लोक जमले असतानाच झालेल्या गोळीबारात अनेकांना प्राण गमवावे लागले. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले. नववर्षाच्या जल्लोषामुळे खूप मोठय़ा आवाजात संगीत वाजत होते. त्यामुळे सुरुवातीला कोणालाची गोळीबाराची कल्पना आली नाही. बराच वेळ फटाके वाजवले जात आहेत की गोळीबार सुरू आहे हे समजू शकले नाही. काही वेळाने जखमी लोक धावताना दिसल्यानंतर सर्वत्र खळबळ निर्माण झाली.
गोळीबाराची ही घटना स्थानिक लोक आणि आशियाई समुदायामधील हिंसाचाराशी जोडली जात आहे. यामध्ये चिनी वंशाच्या 17 वषीय तरुणाचाही मृत्यू झाला आहे. मॉन्टेरी पार्कची लोकसंख्या सुमारे 60,000 आहे. यापैकी 65 टक्के लोक आशियाई अमेरिकन आहेत. यातील बहुतांश लोक चिनी वंशाचे असल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक आहे. स्थानिक आणि आशियन समुदायामधील वादातून ही घटना घडल्याचा दाट संशय असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
गोळीबार झालेले ठिकाण लॉस एंजेलिसपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर एक उपनगरीय क्षेत्र आहे. हल्लेखोरांनी चिनी जोडप्याच्या घरात घुसून गोळीबार केल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलीस दलाकडून याची पुष्टी होऊ शकली नाही. या घराचे फुटेजही समोर आले आहे. हल्लेखोरांचे वैरत्व तेथे उपस्थित लोकांशी नसून एका चिनी जोडप्याशी असल्यामुळे अनेक लोक मारले गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. कोरोनानंतर अमेरिका आणि युरोपमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले झपाटय़ाने वाढले आहेत.
कार्यक्रमादरम्यान हजारो लोक उपस्थित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी हजारो लोक नववर्ष जल्लोषासाठी उपस्थित होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता आहे. येथे दोन दिवसांचा उत्सव सुरू होता. याआधीही या भागात स्थानिक समाज आणि आशियाई समुदाय यांच्यात हिंसाचार झाला आहे. गेल्यावषी अशाच एका घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता.