अध्यक्ष बिडेन यांचा रशियासमोर प्रस्ताव
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशियातील एका न्यायालयाने अमेरिकन बास्केटबॉलपटू ब्रिटनी ग्रिनरला 9 वर्षांचा तुरुंगवास तसेच 10 लाख रुबलचा (सुमारे 13 लाख रुपये) दंड ठोठावला आहे. ब्रिटनीला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. रशियातील न्यायालयाचा हा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी नामंजूर असल्याचे म्हटले आहे. ‘प्रिझनर स्वॅप डील’ स्वीकार करण्याची सूचना त्यांनी रशियाला केली आहे. अमेरिकेसोबत प्रिझनर स्वॅप डीलवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे रशियाने म्हटले आहे.
अमेरिकेने ग्रिनरच्या मुक्ततेच्या बदल्यात रशियासमोर प्रिझनर स्वॅपिंग म्हणजेच इका कैदीच्या बदल्यात दुसऱया कैद्याची मुक्तता करण्याच्या कराराचा प्रस्ताव मांडला होता. अमेरिकेने ब्रिटनीच्या बदल्यात धोकादायक रशियन शस्त्रास्त्रविक्रेता व्हिक्टर बाउटची मुक्तता करण्याचा प्रस्ताव दिला होता. तर रशिया या प्रिझनर डीलमध्ये वादिम कसीसिकोव्हच्या मुक्ततेची मागणी करत आहे. वादिम हा हत्येच्या आरोपाप्रकरणी जर्मनीच्या तुरुंगात कैद आहे.
31 वर्षीय अमेरिकन सुवर्णपदक विजेती ब्रिटनीला 17 फेब्रुवारी 2022 रोजी मॉस्को विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. डब्ल्यूएनबीएच्या ऑफ सीझनमध्ये रशियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेण्यासाठी ती तेथे पोहोचली होती. विमानतळावर तिच्या बॅगमधून अमली पदार्थांशी संबंधित सामग्री मिळाली होती. ब्रिटनीला रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. ब्रिटनीला चुकीच्या पद्धतीने कैद करण्यात आल्याची प्रतिक्रिया बिडेन प्रशासनाने व्यक्त केली होती.