भाजपच्या सायबर कक्षाचे प्रमुख आणि नेते अमित मालवीय यांनी वृत्त वेबसाईट द वायर’ विरोधात गुन्हेगारी तक्रार सादर केली आहे. तक्रारीत या वेबसाईटच्या ज्ये÷ संपादकांनाही आरोपी बनविण्यात आलेले आहे. या वेबसाईटवरून कांही दिवसांपूर्वी केंद्रातील भाजप सरकारची बदनामी करणारे मेटा अहवाल प्रसारीत करण्यात आले होते असा आरोप मालवीय यांनी केला. याच संदर्भात ही तक्रार आहे.
दिल्लीतील पोलीस मुख्यालयातील विशेष आयुक्तांसमोर तक्रार सादर करण्यात आली. मालवीय यांनी मेटाच्या मालकीच्या इन्स्टाग्रामवरील कांही आशय बेकायदेशीररीत्या डिलिट केल्याचे वृत्त द वायरमध्ये प्रसारीत करण्यात आले होते. या वृत्तामुळे आपली बदनामी होत असल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे. त्या संदर्भात वायरने आपली क्षमायाचना करावी असे मालवीय यांचे म्हणणे आहे.
मध्यंतरीच्या काळात द वायरने अनेक वादग्रस्त अहवाल प्रसिद्ध केले होते. या अहवालामधून सरकारची प्रतीमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली होती. या अहवालांच्या स्रोतांवर आक्षेप घेण्यात आले होते. हे स्रोत बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच संदर्भात ही तक्रार सादर करण्यात आली आहे. वायरचे संपादक सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ भाटिया, एम. के. वेणू आणि उपसंपादक जान्हवी सेन यांना आरोपी बनविण्यात यावे, अशी मागणी मालवीय यांनी सादर केलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.