अमित शहा दौर्यात पत्नी सोनल शहा यांनी घेतला माहेरचा घास.
Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा होणार, होणार म्हणून चर्चा रंगली. दौऱ्या दिवशी तर व्हीआयपी बंदोबस्ताच्या रेट्याची झलक कोल्हापूरकरांनी अनुभवली. दौरा संपल्यावर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली. पण या दौऱ्याच्या निमित्ताने अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांच्या कोल्हापूर वास्तव्यांच्या स्मृतीची हलकीफुलकी चर्चा अधिक रंगली. अमित शहा हे कोल्हापूरचे जावई म्हणूनही औत्स्तुक्याचा विषय ठरले. पण एवढं मात्र अगदी खरं की पत्नी सोनल शहा यांच्या आग्रहामुळे अमित शहा यांना सासरवाडीचे कार्यक्रम पुढे मागे करत का होईना पण स्वीकारणे भाग पडले.
लक्ष्मी रोडवर म्हणजे महापालिकेपासून खाली महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताला उरुणकर पेढ्याच्या दुकानाजवळ घनश्यामदास कांतीलालठ नावाचे एक दुकान 1943 पासून आहे. मूळ गुळाच्या या दुकानात आता मनुके, बेदाने, काजू, खारीक असा सुक्या-मेव्याचा होलसेल व्यापार चालतो. व्यापार क्षेत्रात या पिढीचा लौकिक खूप चांगला आहे. या दुकानाचे कांतीलाल, नवनीत व सुंदरलाल हे तिघे सख्खे भाऊ मालक आहेत. त्यापैकी सुंदरलाल शहा यांची कन्या सोनल ही अमित शहा यांची पत्नी आहे.
दुकान लक्ष्मी रोडवर असले तरी हे कुटुंब राहायचे छत्रपती शिवाजी चौकात माळकर वाड्यामध्ये. सोनल शहा पद्माराजे गर्ल्स स्कूलमध्ये शिकायच्या. त्यांना दीपिका, बिना या दोन बहिणी व अश्विन, दीपक हे दोन भाऊ. सोनल गुजराती कुटुंबातल्या असल्या तरी त्यांचा स्वभाव सर्वांना मिसळून घेणारा असल्याने त्यांच्या मैत्रिणी सर्व घटकातल्या. त्यांचे लग्न 1987 साली अमित शहा यांच्याशी झाले. त्यावेळी ते आरएसएस चे कार्यकर्ते होते. राजकारणात थोडेफार सक्रिय होते.
कारण 1991 पर्यंत अमित शहा यांची कोल्हापुरात सासरवाडीत बऱ्यापैकी ये-जा होती. पण त्यानंतर ते राजकारणातच अधिक सक्रिय झाले. सासरे सुंदरलाल यांचे कोल्हापुरात निधन झाल्यावरही ते अगदी अल्पकाळ येथे आले. कोल्हापुरातील त्यांचा दौरा ठरवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. पण त्यांच्या बायकोचा शब्द त्यांचा दौरा निश्चित होण्यासाठी भारी पडला. आपल्या बायकोच्या शाळेच्या शतक महोत्सवी समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण तसे सहज नाकारण्यासारखेच नव्हते. कारण या शाळेने, संस्थेनेही आपले नाव कोल्हापूर परिसरात चांगले उभे केले आहे.त्यामुळे हा दौरा निश्चित झाला.
वास्तविक एक फेब्रुवारीस हा दौरा होणार होता पण या ना त्या कारणाने तो पुढे गेला. व दौऱ्याची निश्चिती झाल्यावर शाळेच्या या कार्यक्रमाबरोबरच अन्य कार्यक्रमही निश्चित झाले. काल कार्यक्रम आटोपून विमानतळावर परत जाताना सोनल शहा त्यांचे काका किरण शहा चुलत भाऊ चिंतन शहा यांच्या घरी गेल्या. मात्र हे करताना त्यांनी त्याला शासकीय द्रौऱ्याचे स्वरूप दिले नाही. यानिमित्ताने सारा शहा परिवार, सोनल शहा यांच्या मैत्रिणी एकत्र आल्या. गप्पा टप्पा झाल्या. घरगुती चर्चेबरोबरच सारा परिवार हास्य विनोदात रंगून गेला. रात्री अमित शहा यांचा दौरा आटोपला. पण त्यांच्या पत्नी सोनल शहा यांच्या सहभागाने एक कौटुंबिक किनारही जोडून गेला.