ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई महापालिका काबीज करायची हा भाजपचा मनसुबा आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई पालिकेवर सत्ता आणायची यादृष्टीने भाजप तयारीला लागलं आहे. यासाठी भाजपने आशिष शेलारांकडे पुन्हा मुंबईची जबाबदारी दिली आहे. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. दरम्यान, लालबागचा राजा (Lalbaugcha Raja), सिद्धिविनायक (Sidhivinayak) गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आणि भाजप मिशन मुंबई (Mission Mumbai BJP) महापालिकेचा शुभारंभ करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा (Amit Shah) येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना अमित शाह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शाहांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांचा हा दौरा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात असणार आहे. यामध्ये ते सर्वात प्रथम लालबागच्या राजा आणि सिद्धीविनायकाचं दर्शन घेणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर शहांच्या नेतृत्त्वाखाली मिशन मुंबई महापालिकेच्या विजयासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होईल.
अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येतात. शाह २०१७ मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शनाला आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार आहेत. त्याच बरोबर मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भातही बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.