नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नीती आयोगाचे माजी प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांची ‘जी-20’ चे नूतन ‘शेर्पा’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शेर्पापद केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांच्याकडे आहे. आता यास्थानी अमिताभ कांत हे येतील. या वर्षाच्या उत्तरार्धात ‘जी-20’चे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे.
शेर्पापद हे जी-20 मध्ये महत्त्वाचे मानले जाते. शेर्पाकडे जी-20 बैठकांचे व्यवस्थापन असते. बैठकांची कार्यक्रमपत्रिका ठरविण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आता या संघटनेचे अध्यक्षस्थान भारताकडे येणार असल्याने शेर्पाचे काम वाढणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांच्याकडे अनेक विभागांचा कार्यभार असल्याने त्यांना शेर्पाचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ काढता येत नाही. म्हणून त्यांनी पदत्याग करण्याचा मार्ग स्वीकारला, असे स्पष्ट करण्यात आले.