दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय ः पूर्वानुमती आवश्यक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव, त्यांचा आवाज आणि फोटो आता परवानगीशिवाय कोणीही वापरू शकणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी यासंबंधी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अपील करत आपले व्यक्तिमत्व, आवाज आणि नाव सुरक्षित ठेवण्याची विनंती केली होती. काही कंपन्या अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या नावाची लॉटरीची जाहिरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जारी झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रसिद्ध वकील हरीश साळवे हे अमिताभ यांची केस लढत आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती चावला यांनी प्राधिकरण आणि दूरसंचार विभागाला सूचना करताना सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले अमिताभ बच्चन यांचे नाव, फोटो आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े तात्काळ काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय दूरसंचार विभागाला बच्चन यांच्या नावाचा आणि आवाजाचा बेकायदेशीर वापर करणाऱया फोन नंबरची माहिती देण्यासही सांगितले आहे. तसेच इंटरनेट सेवा पुरवठादारांना बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हक्क बिघडवणाऱया ऑनलाईन लिंक्स काढून टाकण्यासही सांगण्यात आले आहे.