चार कामगार गुदमरले : हॉस्पिटलमध्ये केले दाखल
प्रतिनिधी / मडगाव
पंचवाडी पाणी प्रक्रिया प्रकल्पात काल गुरुवारी अमोनिया गॅसगळती झाल्याने या ठिकाणी काम करणारे चार कामगार गुदमरले. त्यांना तातडीने हॉस्पिसियो दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमोनिया गॅसगळतीमुळे या पाणी प्रक्रिया प्रकल्पावर काम करणारे हरिष गुंड, केतन चौगुले, धीरज भोसले व जयवंत निकम हे कामगार गुदमरले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले.
अमोनिया गॅसची गळती लागल्याची माहिती मिळताच कुडचडे व फोंडा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तसेच डेक्कन फायर प्रोटेक्शन टिमची मदत घेण्यात आली. सर्वांनी मिळून अमोनिया गॅसची गळती बंद केल्याची माहिती कुडचडे अग्निशामक दलाचे अधिकारी दामोदर जांबावलीकर यांनी दिली. अमोनिया गळती बंद करण्याची प्रक्रिया अग्निशामक दलाचे विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.