ऑनलाईन टीम / मुंबई :
सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळाव्यात आ. अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी लग्नातील कन्यादानाच्या विधीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु आहे. गुरुवारी पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून मिटकरींच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आल होतं. दरम्यान अमोल मिटकरी यांनी या वादावर तीन शब्दांचं ट्वीट केलं आहे.
मिटकरी यांनी “वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll….” असं ट्वीट करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे. मिटकरी म्हणाले, ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाही. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते मिटकरी?
मेळाव्यातील भाषणात बोलताना मिटकरी म्हणाले, एका ठिकाणी मी गेलो होतो. त्या ठिकाणी कन्यादान होते. मुलीचा बाप म्हणे साहेब बसा थोडं कन्यादान आहे. मी म्हटलं का हो, अन्नदान ऐकलं, रक्तदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं. कन्या हा दान करण्याचा विषय असतो का हो. ते म्हणाले, असतो ना. आम्हाला शिकवलंय. असतो. बसा म्हटले. बसलो खुर्चीवर. बरं नवरदेव पीएच.डी. नवरी एम. ए. झालेली, अशा शब्दांत मिटकरिंचे नकलेसह भाषण रंगात आलेले. त्यानंतर धुपमं दीपम नवैद्यम नमस्कारमं नमस्करोती. डोळय़ाला पाणी लावा. हात पुढे करा. तुमचा हात माझ्या हातात द्या. तुमच्या पत्नीचाही हात माझ्या हातात द्या. म्हणा मम् भार्या समर्पयामि. आचमन करा. धुपमं दीपम नवैद्यम नमस्कारमं नमस्करोती. मम भार्या समर्पयामि. मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे येडय़ा, ते महाराज असं म्हणतायत मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा. मिटकरींच्या या वक्तव्यांवेळी मंचावर एकच हशा पिकला. मात्र, ब्राह्मण महासंघ मिटकरेंच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाला असून, मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी, अशी मागणी होत आहे.