पत्रकार परिषदेत दिली माहिती : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची राहणार उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा को-ऑप. बँकेचा अमृतमहोत्सव सोहळा बुधवार दि. 11 रोजी होणार आहे. सकाळी 8 वा. बसवाण गल्ली येथील बँकेच्या सभागृहात कार्यक्रम होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कॉ. कृष्णा मेणसे असणार आहेत, अशी माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
1942 साली मराठा बँकेची स्थापना झाली. बहुजन समाजाला व्यापार, उद्योग, शिक्षण, घर बांधणीसाठी आर्थिक साहाय्य मिळावे, या उद्देशाने मराठा बँकेची स्थापना झाली. राष्ट्रवीरचे माजी संपादक कै. गुरुवर्य शामराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीनंतर पांगुळ गल्ली येथे एका लहानशा जागेत बँकेचा शुभारंभ झाला. छोटय़ाशा रोपटय़ाचा आज वटवृक्ष झाला आहे.
2017 मध्ये बँकेला 75 वर्षे पूर्ण झाली. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे अमृतमहोत्सव होऊ शकला नाही. त्यानंतर दोन वर्षे कोरोनामुळे कार्यक्रम घेता आला नाही. अखेर बुधवार दि. 11 रोजी हा कार्यक्रम होणार आहे. बँकेचे 9 हजार 307 सभासद असून, 2 कोटी 70 लाख रुपयांचे भागभांडवल आहे. 161 कोटी 11 लाखांच्या ठेवी तर 62 कोटी 50 लाख रुपयांचा राखीव निधी आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेला 2 कोटी 61 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. येणाऱया काळात शहराच्या बाजूला 4 शाखा सुरू करण्याचा विचार असल्याचे संचालक बाळासाहेब काकतकर यांनी सांगितले.
आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकीही जपली
बँकेने मागील 75 वर्षांत आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. दरवषी दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. वयाची 60 वर्षे व सभासद होऊन 25 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना वृद्धापकालीन सुविधा रु. 1 हजार देण्यात येत असल्याची माहिती संचालक दीपक दळवी यांनी दिली.
यावेळी व्हा. चेअरमन नीना काकतकर, बाळाराम पाटील, बाबुराव पाटील, विनोद हंगीरकर, सुशीलकुमार खोकाटे, सुनील अष्टेकर, लक्ष्मण होनगेकर, विश्वनाथ हंडे, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर, लक्ष्मण नाईक, जनरल मॅनेजर संतोष धामणेकर उपस्थित होते.