गणेशभक्तांना मिळाला दिलासा
प्रतिनिधी/ खेड
गणेशोत्सवामुळे कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांना होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणखी 5 एक्सप्रेस गाडय़ांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात आला आहे.
यामध्ये यशवंतपूर-वास्को-द-गामा, वास्को-द-गामा-वेलंकनी, वास्को-द-गामा -वेलंकनी स्पेशल एक्सप्रेस, वास्को-पटना व जामनगर-तिरूनेलवेली एक्सप्रेसचा समावेश आहे. या एक्सप्रेस गाडय़ांना जोडण्यात आलेल्या अतिरिक्त डब्यांमुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून गणपती स्पेशलपाठोपाठ एक्सप्रेस गाडय़ांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटा अजूनही सुरूच असल्याने गणेशभक्त सुखावले आहेत.
गणपती स्पेशल धावताहेत हाऊसफुल्ल
कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ा हाऊसफुल्लच धावत आहेत. रेल्वे गाडय़ांना उसळणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे सुरक्षा बळ त्या-त्या स्थानकात तैनात करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही नियोजनावर अधिक भर देण्यात आला आहे.