बाजार बंदची माहिती नसल्याने संभ्रम ः लम्पिस्कीनचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने घेतला निर्णय
वार्ताहर/ अगसगे
बेळगाव तालुक्यात जनावरांना लम्पिस्कीन (त्वचारोग) रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी बेळगाव एपीएमसी आणि हिरेबागेवाडीतील जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश बजावला होता. मात्र, बहुतांश जणांना याची माहिती नसल्याने खरेदीदार आणि विक्रीदार आपली जनावरे घेऊन बाजारपेठेकडे जाण्यासाठी दाखल झाले. पण, बाजार बंद असल्याचे समजताच त्यांनी चक्क एपीएमसीतील भाजीमार्केट प्रवेशद्वारासमोरच बाजार भरवला. यामुळे वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण झाला.
सध्या बेळगाव तालुक्यामध्ये लम्पिस्कीनचा (त्वचारोग) प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱयांनी रोग आटोक्यात येईपर्यंत बेळगाव आणि हिरेबागेवाडी जनावरांची बाजारपेठ बंद करण्याचा आदेश एपीएमसीला दिला आहे. मात्र याची माहिती नसलेल्या काही शेतकऱयांनी आणि जनावरांच्या तेजी-मंदी दलालांनी आपली जनावरे विक्रीसाठी आणताच मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांची वाहने गेटजवळ सेक्युरिटीने अडवून बाजार बंद असल्याची माहिती शेतकऱयांना दिली. यामुळे निराश झालेल्या शेतकऱयांनी एपीएमसीतील भाजीमार्केटच्या प्रवेशद्वारासमोरील खुल्या जागेत बाजार भरवला. यावेळी केवळ तीस ते चाळीस म्हशी विक्रीसाठी बाजार आल्या होत्या. मात्र रोगाचा प्रादुर्भाव असल्याने खरेदीदारांनी म्हशी खरेदीकडे पाठ फिरविल्याने केवळ पाच ते सहा जनावरांचीच विक्री झाली. यामुळे शेतकऱयांना आपली जनावरे पुन्हा घरी घेऊन जाण्याची वेळ आली. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा देखील वाया गेला.
सध्या 117 जनावरांना या रोगाची लागण झाली असून काही जनावरे दगावली आहेत. या रोगावर पशुसंगोपन खात्यामार्फत उपचार सुरू आहेत. जनावरांवर या रोगाची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. यामुळे शेतकरी देखील चिंताग्रस्त बनला आहे.
…तोपर्यंत जनावरे बाजारात आणू नये
एपीएमसी भाजी मार्केटचे प्रवेशद्वार बेळगाव-कंग्राळी खुर्द मुख्य रस्त्यावर आहे. प्रवेशद्वारासमोरच जनावरांचा बाजार थाटल्याने बाजूलाच जनावरे वाहतुकीची वाहनेही उभी केल्याने रस्त्यावरच शेतकऱयांची गर्दी झाली होती. यामुळे वाहतुकीला मोठय़ाप्रमाणात अडथळा निर्माण झाला. तरी संबंधितांनी लम्पिस्कीन रोग नियंत्रणात येईपर्यंत आपली जनावरे बाजारात आणू नये, असे आवाहन एपीएमसीतर्फे करण्यात आले आहे.