Tarun Bharat

संगीतात रममाण कलाकाराचमध्ये संगीतरूपी आकाशात झेप घेण्याची क्षमता

मंत्री गोविंद गावडे यांचे प्रतिपादन : फर्मागुडी येथे 34 वे गिरिजाताई संगीत संमेलन उत्साहात,आज शनिवारी समारोप सोहळयात मान्यवरांच्या मैफिली

प्रतिनिधी /फोंडा

संगीतातील ताल, लय, स्वर या अलंकारावर जो मनोभावे साधना करतो तोच यशाची किनार गाठतो. संगीतात आपली पाळेमूळे घट्ट रोवून उभा राहिलेला कलाकारच संगीतरूपी आकाशाकडे झेप घेण्याची क्षमता राखतो असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली.

34 व्या स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर स्मृती संगीत समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फोंडा पत्रकार संघ आणि गिरीजाताई संगीत संमेलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कला व संस्कृती खात्याच्या सहकार्याने फर्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी हा संगीत समारोह पार पडला. मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते दिप प्रज्वलीत करुन व गिरीजाताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन या संगीत संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते पत्रकार अवित बगळे, स्वागताध्यक्ष रघुनाथ फडके, आयोजन समिती अध्यक्ष संजय घाटे, संमेलनाध्याक्ष जयंत मिरींगकर, तसेच पत्रकार नरेंद्र तारी हे व्यासपीठावर उपस्थित होते. गोविंद गावडे पुढे बोलताना म्हणाले पत्रकार संगीत संमेलन हे एक दर्जेदार संगीत संमेलन असून आनंदप्राप्तीचे साधन म्हणून संगीताकडे पहाणे इष्ट असल्याचे ते म्हणाले. संमेलन समितीप्रती त्यानी आपल्या भावना व्यक्त करताना संस्थापक सदस्य गोकुळदास मुळवी यांचे आभार व्यक्त केले.

प्रमुख वक्ते अवित बगळे म्हणाले लोककलेचा नंदादीप अखंड तेवत ठेवण्यासाठी संमेलने होणे गरजेचे आहे. गोमंतकीय संस्कृतीचा ग्रामिण वारसा जपण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जयंत मिरींगकर पुढील वर्षी संमेलन दोन दिवसापुरते मर्यादीत न ठेवता तीन दिवसीय करण्यासाठी प्रयत्न राहील असे ते म्हणाले. या संमेलनाचे औचित्य साधून ‘स्वरांजली’ या स्मरणिकेचे अनावरण मंत्री गोविंद गावाडे यांच्याहस्ते करण्यात आले. रघुनाथ फडके पुरस्कृत पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ संवादिनी वादक विठ्ठल विष्णू खांडोळकर यांना प्रदान करण्यात आला. घाटे परिवार पुरस्कृत स्व. लक्ष्मीकांत घाटे ट्रस्टचा पुरस्कार ज्येष्ठ कलाकार व्यंकटेश परवार यांना तर कृतार्थ म्हार्दोळचे राजेंद्र लक्ष्मीकांत देसाई यांना संमेलन समितीतर्फे कलाप्रेमी म्हणून मंत्री गावडे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

  सत्काराला उत्तर देताना राजेंद्र देसाई म्हणाले राज्यात महानाटय़ाचे आयोजन करण्याची संधी ही आपल्य आयुष्यातील महत्वाची घटना असून त्यानंतर गोमंतकातील पहिल्या महानाटय़ाचा प्रवास व नंतर कृतार्थच्या माध्यमाने अविरत सुरू असलेली कलेची सेवेची दखल समाजाने घेतल्याबद्दल ऋणी असल्याचे मत व्यक्त केले. दशावतारी नाटकाला पुर्नजिवीत करण्यासाठी आपली धडपड सुरू असल्याचे त्यानी यावेळी नमूद केले.

  पहिल्या सत्रात कु. देवश्री च्यारी ही गणेश वंदना सादर केली. तिला संवादिनीवर दामोदर च्यारी तर तबल्यावर ग्रजेश तारी हे साथसंगत केली. रघुनाथ फडके यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष जाण यांनी तर संजय घाटे यांनी आभार मानले. उद्घाटन सोहळय़ानंतर सायं. 6 वा. मुंबई येथील प्रसिद्ध गायिका अपूर्वा गोखले यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांना संवादिनीवर दत्तराज सुर्लकर तर तबल्यावर मयांक बेडेकर यांनी साथसंगत केली.

आज समारोप सोहळयाला मान्यवरांच्या मैफिली

आज शनिवार 3 रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10 वा. दामोदर च्यारी यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना संवादिनीवर दत्तराज सुर्लकर तर तबल्यावर ग्रजेश तारी हे साथसंगत करतील. 11 वा. पुणे येथील कल्याणी देशपांडे यांचे सतार एकलवादन होईल. त्यांना तबल्यावर ऋषिकेश फडके हे साथसंगत करणार आहेत. सायं. 5 वा. तिसऱया सत्रात रघुनाथ फडके यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर विठ्ठल खांडोळकर व तबल्यावर दत्तराज शेटये हे साथसंगत करतील. सायं. 6 वा. मुंबई येथील पं. विभव नागेशकर यांचे तबला एकलवादन होणार असून त्यांना संवादिनीवर दत्तराज म्हाळशी हे साथसंगत करतील. शेवटच्या सत्रात सायं. 7.30 वा. नाटय़संगीत रजनी कार्यक्रम होणार असून त्यात ओंकार प्रभू घाटे (मुंबई), अंबर मिरिंगकर (गोवा) व सिद्धी शेलार मळीक (गोवा) या कलाकारांचा सहभाग असेल. त्यांना संवादिनीवर अनय घाटे, तबल्यावर तुळशीदास नावेलकर व ऑर्गन प्रदीप शिलकर हेसाथसंगत करतील. दुर्गाकुमार नावती, शकुंतला भरणे, दीपा मिरिंगकर, धर्मानंद गोलतकर, नरेंद्र तारी व गिरीश वेळगेकर हे विविध सत्रांचे निवेदन करणार आहेत.

Related Stories

‘त्या’ आसामी संशयितांच्या ‘बांगलादेश कनेक्शन’चा तपास

Amit Kulkarni

पाण्याच्या बिलात भरमसाठ वाढ केल्याने सावर्डेत महिलांचा मोर्चा

Amit Kulkarni

गोवा राज्याची स्वंयपूर्णतेकडे वाटचाल- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Amit Kulkarni

खांडोळा येथील श्री महागणपती देवस्थानात चोरीप्रकरणी चोरटय़ाला अटक

Amit Kulkarni

श्रीदामबाबाचा गुलालोत्सव भक्तीभावाने

Amit Kulkarni

मगो-तृणमूल युतीमुळे राजकीय परिवर्तन निश्चित

Patil_p