आयुष-संरक्षण खात्यात करार : कॅन्टोन्मेंट बोर्डकडून तयारी
प्रतिनिधी /बेळगाव
देशातील प्रत्येक कॅन्टोन्मेंट आवारात आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र सुरू करण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. याकरिता आयुष आणि संरक्षण खात्यामध्ये करार करण्यात येणार आहे. प्रत्येक कॅन्टोन्मेंट परिसरात आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र सुरू करण्याची तयारी करण्यात येत असून बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये देखील केंद्राची सुरूवात होणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने आयुर्वेदिक केंद्र सज्ज केले आहे.
केंद्रीय संरक्षण खात्याने आयुर्वेदिक उपचार पद्धतीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या प्रत्येक रुग्णालयात आयुर्वेदिक चिकित्सा केंद्राची स्थापना करून नागरिकांना आयुर्वेदिक चिकित्सा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयुष आणि संरक्षण खात्याने याबाबतचा करार केला आहे. या करारानुसार संरक्षण खात्याने देशातील प्रत्येक कॅन्टोन्मेंट बोर्डला पत्र पाठवून आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याची सूचना केली आहे. याबाबतचा आदेश बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डलादेखील देण्यात आला आहे. दि. 18 पर्यंत केंद्र सज्ज ठेवण्याची सूचना करण्यात आली होती.
त्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालय आवारात असलेल्या रुग्णालयात आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी कक्ष उपलब्ध करून दिला आहे. याठिकाणी आयुष च्यावतीने वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिकित्सा केंद्रात सर्व औषधे उपलब्ध करण्यात येणार आहेत. गुरुवार दि. 21 रोजी संरक्षण खाते आणि आयुष यांच्यात चिकित्सा केंद्राचा करार होणार असून याच दिवशीपासून कॅन्टोन्मेंटचे आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र सुरू होणार आहे.