पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) आणि एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन यांनी निर्मिती केलेल्या टिलीमिली या मालिकेचे 2 हजार 592 भाग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता संकेतस्थळाद्वारे मोफत पाहता येणार आहेत. तसेच या पाठांवरील 16 हजार प्रश्नही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे राज्यातील शाळा बंद असतानाच्या काळात एमकेसीएल आणि एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन यांच्यातर्फे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने (एससीईआरटी) दूरदर्शनवर टिलीमिली ही शैक्षणिक मालिका प्रसारित करण्यात आली होती. मराठी माध्यमातील पहिली ते आठवीच्या सर्व विषयांच्या पाठांवर आधारित 864 भाग मनोरंजनात्मक पद्धतीने सादर करण्यात आले. त्यामुळे शाळा बंद असतानाच्या काळात राज्यभरातील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिकण्याची संधी प्राप्त झाली. आता या मालिकेतील प्रत्येक भाग सात ते आठ मिनिटांच्या तीन भागात करून त्याचे 2 हजार 592 भाग तयार करण्यात आले आहेत. हे भाग http://tilimili.mkcl.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. हे भाग विद्यार्थ्यांना मोफत पाहता येतील. तसेच 16 हजार प्रश्नही ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले आहेत. हे प्रश्न सोडवून विद्यार्थी आपले आकलन विद्यार्थ्यांना पडताळून पाहता येतील, उजळणी करता येईल.
ज्ञानरचनावादी पद्धतीने केलेल्या टिलीमिली या शैक्षणिक मालिकेचे सर्व भाग एमकेसीएलच्या सर्व्हरवरून दाखवले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही जाहिराती, प्रलोभनांचे अडथळे न येता पाहता येतील. संगणक, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनद्वारे विद्यार्थी हे भाग पाहू शकतात, असे सावंत यांनी नमूद केले.