वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मल्टीब्रँड ऑटोमोटिव्ह कंपनी स्टेलेंटिसने युएस स्टार्टअप आर्चर एव्हिशनसोबत इलेक्ट्रिक विमानाच्या निर्मितीसाठी हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्या 2024 पासून इलेक्ट्रिक विमानाच्या निर्मितीस सुरुवात करणार आहेत. दोन्ही कंपन्यांकडून तयार करण्यात आलेले विमान 445 किलोग्रॅम वजनासह उड्डाण करण्यास सक्षम असणार आहे. हे विमान वैमानिकासह 5 जणांना घेऊन उड्डाण करू शकेल आणि एकदा चार्ज केल्यावर 160 किलोमीटरचे अंतर कापू शकणार आहे.
दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार स्टेलेंटिस स्वतःचे निर्मितीकौशल्य आर्चरला उत्पादन करण्यासाठी देणार आहे. याच्या मदतीने आर्चर या विमानाच्या व्यावसायिक निर्मितीत वेग आणणार आहे. याचबरोबर स्टेलेंटिस अनुभवी कर्मचारीही नेमणार आहे. तसेच आर्चरला स्टेलेंटिस 150 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कमही पुरविणार आहे.
पुढील वर्षी सुरू होणार निर्मिती
स्टेलेंटिस जॉर्जियाच्या कोविंग्टनमध्ये निर्मिती सुविधा निर्माण करण्यासाठी आर्चरसोबत काम करणार आहे. 2024 मध्ये मिडनाइट विमानाचे उत्पादन सुरू करण्याची दोन्ही कंपन्यांची योजना आहे. दोन्ही कंपन्यांकडून तयार केल्या जाणाऱया या इलेक्ट्रिक विमानाची कक्षा 160 किलोमीटर इतकी आहे.
दोन्ही कंपन्यांचे लक्ष्य अर्बन एअर मोबिलिटीमध्ये काही नवे करण्याचे आहे. याचमुळे दोन्ही कंपन्या स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करत नव्या एअर मोबिलिटी व्हेईकलला लवकरात लवकर बाजारात आणू पाहत आहेत. स्टेलेंटिस स्वतःचे निर्मिती तंत्रज्ञान आणि कुशलतेचा वापर इलेक्ट्रिक विमानाची मोठय़ा प्रमाणावर निर्मितीसाठी करणार आहे. दोन्ही कंपन्यांदरम्यान 2020 पासूनच धोरणात्मक सहकार्य जारी आहे. स्टेलेंटिसने 2021 मध्ये आर्चर कंपनीत गुंतवणूक केली होती.
बीटा टेक्नॉलॉजीजकडूनही प्रयत्न
एक अन्य कंपनी बीटा टेक्नॉलॉजीज देखील इलेक्ट्रिक विमान तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीने अलिया नावाने एक विमान तयार केले आहे. हे विमान ड्रोनसारखे दिसते. हे विमान 1400 पाउंड कार्गो किंवा 6 लोकांना एकाचवेळी नेण्याची क्षमता बाळगून आहे. अलिया सीरिज एक्सएमचे संस्थापक मार्टिन रोथब्लॅट आणि हॉर्वर्डचे माजी विद्यार्थी काइल क्लार्क यांच्या संकल्पनेतून हे विमान तयार झाले आहे.