गाव प्रमुखपदापासून सर्व कामे तिच्याकडेच
जगात एक असे गाव आहे, जेथे राहण्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा आहेत, परंतु तेथे केवळ एकच व्यक्ती राहते. अमेरिकेच्या नेब्रास्का प्रांतात वसलेल्या मोनोवी गावाची ही गोष्ट आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही गावात 100 ते 200 लोक राहत असतात. परंतु या गावात मात्र एक महिला राहते. ही महिला देखील वृद्ध असून तिच्यानंतर हे गाव ओसाड पडणार असल्याचे मानले जात आहे. 2004 पासून या गावाची लोकसंख्या एकच राहिली आहे.
2004 पासून एकटी
नेब्रास्कातील हे गाव 2004 मध्ये एक लोकसंख्येवर आले आहे. येथे माणसांना आवश्यक सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, रेस्टॉरंट, बार आहे तरीही येथे केवळ एकच व्यक्ती राहते. येथे राहणाऱया महिलेचे नाव एल्सी आयलर असून त्यांचे वय 86 वर्षे आहे. एल्सीच या गावाची सर्व कामे करतात. त्या या गावात बारटेंडर म्हणून काम करतात आणि त्या स्वतः तेथील मेयर आहेत. पूर्वी त्या पतीसोबत राहत होत्या, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्या एकटय़ा राहिल्या आहेत.
पर्यटक देतात गावाला भेट
मोनोवी गाव सुमारे 54 हेक्टरमध्ये फैलावलेले आहे. 1930 पर्यंत या गावात सुमारे दीडशे लोक राहत होते. परंतु हळूहळू येथील लोक स्थलांतर करू लागले आणि तेव्हापासून लोकांची संख्या कमी होत गेली. 1980 पर्यंत येथे केवळ 18 लोक राहिले होते. आता अनेक वर्षांपासून येथे केवळ एक महिला राहत आहे. या गावात दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. त्यांना सुविध पुरविण्यासाठी एल्सी यांनाच पुढाकार घ्यावा लागतो.