गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार ः हातात भूण घेऊन पोलीस अधिकाऱयाकडे पोहोचली महिला
वृत्तसंस्था / बरेली
उत्तरप्रदेशच्या बरेलीमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील मझगवां गावात एका गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या सामूहिक बलात्कारामुळे महिलेचा गर्भपात झाला. बलात्कार पीडितेची सासू हातात भ्रूण घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात न्याय मागण्यासाठी पोहोचल्यावर तेथे खळबळ उडाली.
क्रूरकर्म्यांनी 3 महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याने तिचा गर्भपात झाला. महिला शेतात काम करण्यासाठी गेली असता गुन्हेगारांनी तिच्यावर हे अत्याचार केले आहेत. बलात्कारानंतर आरोपींनी महिलेला तेथेच सोडून पळ काढला. बराचवेळ पीडित महिला घरी न पोहोचल्याने तिला शोधण्यासाठी कुटुंबीय बाहेर पडले होते. शेतात पोहोचल्यावर पीडित महिला अत्यंत गंभीर स्थितीत आढळून आली. कुटुंबीयांनी या महिलेला खासगी रुग्णालयात हलविले, जेथे डॉक्टरांनी गर्भातील जीव वाचविण्याचा प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. बलात्कारादरम्यान महिलेचा गर्भपात झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महिलेचे कुटुंबीया न्याय मिळावा म्हणून पोलीस अधिकाऱयांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. पीडित महिलेची सासू प्लास्टिकच्या जारमध्ये भ्रूण घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचली. हा प्रकार पाहून पोलीस अधिकाऱयांमध्ये खळबळ उडाली. गुन्हय़ाची दखल घेत पोलीस अधीक्षक राजकुमार अग्रवाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.