सेन्सेक्स 59,831 अंकांवर, तर निफ्टी 17,730 अंकांवर बंद
मुंबई
हिंदू संवत्सर 2079 वर्षाच्या शुभारंभप्रसंगी दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअरबाजारामध्ये मुहूर्त टेडिंगचे सत्र तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले आहे. यात सेन्सेक्स निर्देशांक 524 अंकांनी वधारत 59,831 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 154 अंकांनी वधारत 17,730 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 6.15 वा. ते 7.15 पर्यंतच्या दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये 10 वर्षानंतर अशा तेजीसह बाजार बंद झाल्याचे सांगितले जाते.
सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच 30 समभागांचा सेन्सेक्स 635 अंकांनी वाढला होता. तर निफ्टीही जवळपास 192 अंकांपर्यंत वाढला होता. दूरसंचार, वित्तीय सेवा, बँका, उद्योग यांच्या समभागांनी खास सत्राला चांगला आधार दिला. एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एनटीपीसी आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग बऱयापैकी वधारले होते. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 438.89 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते.