बेळगाव : रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याच हेतूने ‘डॉ. साठे आरोग्यमित्र फौंडेशनने डॉक्टरांसाठी 78 दिवस’ हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती फौंडेशनचे संचालक डॉ. वर्षा साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी बोलाविलेल्या परिषेदत त्या म्हणाल्या, डॉक्टर नेहमीच रुग्णांवर उपचार करतात. परंतु त्यांनाही दीर्घकाळ काम, ताणतणाव, अतिश्रम या समस्यांना सामोरे जावे लागते. सतत कार्यरत राहिल्याने जेवण, झोप, विश्रांती याकडे दुर्लक्ष होते. डॉक्टरांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असल्याने आरोग्यमित्रने त्यांना 78 दिवसांचे आव्हान दिले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाल्याने 78 दिवस ही संकल्पना असून या कालावधीत डॉक्टरांनी सायकल चालविणे, धावणे, चालणे यापैकी एक किंवा तिन्ही व्यायामाची निवड करून सातत्य ठेवावयाचे आहे. यासाठी एक अॅप तयार करण्यात आले असून त्यावर सर्व माहिती संकलित केली जाईल, असे त्या म्हणाल्या. हा उपक्रम पूर्णत: विनामूल्य असून पुढील काळात शाळा व कॉलेजमध्ये तो राबविला जाईल. फौंडेशनतर्फे रस्ते सुरक्षा, प्रथमोपचार, विविध विकारांवर डॉक्टरांशी चर्चा, जीवनदायिनी संच असे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. दि. 29 सप्टेंबर रोजी ‘आरोग्य मेळा’ घेण्यात येणार असून तो सर्वांसाठी खुला असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या 100 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात डॉ. साठे कुटुंबीय कार्यरत आहे. ‘आरोग्य मित्र’अंतर्गत 15 जणांची समिती नेमल्याचे फौंडेशनचे सदस्य राज बेळगावकर यांनी सांगितले. याप्रसंगी तृप्ती चचडी उपस्थित होत्या.