गळा दाबून आठ तोळय़ांचे दागिने लांबविले, प्रतिकार पडला तोकडा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ांचे प्रकार सुरूच आहेत. आता तर गुन्हेगारांनी एकाकी वृध्दांना टार्गेट केले आहे. शनिवारी सकाळी एकाकी राहणाऱया वृध्देच्या घरात घुसून तिचे तोंड व गळा दाबून एका भामटय़ाने वृध्देच्या अंगावरील आठ तोळय़ाचे दागिने पळविले आहेत. संगमेश्वरनगर परिसरात ही घटना घडली असून परिसरात खळबळ माजली आहे.
मालन मारुती जाधव (वय 67) या वृध्देचा गळा दाबून त्यांच्या हातातील चार बिल्वर, दोन पाटल्या भामटय़ाने पळविल्या आहेत. मालन यांनी मोठय़ा धाडसाने भामटय़ाला विरोध केला. मात्र बाथरुममध्ये नेऊन त्यांचे तोंड व गळा दाबल्याने त्या बेशुध्द झाल्या. यावेळी भामटय़ाने त्यांच्या अंगावरील दागिने पळविले आहेत. यावेळी झालेल्या झटापटीत मालन किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. या घटनेने त्यांना जबर धक्काही बसला आहे.
शनिवारी सकाळी 11.15 ते 11.30 यावेळेत ही घटना घडली आहे. एपीएमसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भामटय़ाचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार मालन या घरी एकटय़ा राहतात. संगमेश्वरनगर (पूर्वीच्या साई हॉलजवळ) त्यांचे घर आहे. शनिवारी सकाळी त्या स्वयंपाकघरात काम करीत होत्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. त्यांच्या घरात शिरलेल्या भामटय़ाने पाठीमागून येऊन मालन यांच्या डोळय़ांवर दोन्ही हात ठेवले. आपलीच नातवंडे आली असतील म्हणून त्यांनी कोण आहे? अशी विचारणा केली.
मालन यांनी विचारणा करुनही भामटय़ाने त्यांना उत्तर दिले नाही. डोळे झाकून ठेवूनच त्यांना बाथरुममध्ये नेले. त्यावेळी त्यांना संशय आला. कोणी तरी अज्ञात आपल्या घरात शिरला आहे हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. भामटय़ाबरोबर त्यांची झटापटही झाली. त्यांची आरडाओरड ऐकून त्यांच्याच घरातील भाडेकरु तरुण धावत आला.
बाथरुममधून आवाज येत होता. त्यामुळे त्याने एकदम बाथरुममध्ये जाण्याचे टाळले. मालन यांची आरडाओरड बंद करण्यासाठी भामटय़ाने त्यांचे तोंड दाबले. त्यानंतर गळा आवळण्यात आला. या प्रकाराने त्या बेशुद्ध पडल्या. हीच संधी साधून भामटय़ाने त्यांच्या हातातील आठ तोळय़ांच्या पाटल्या व बिल्वर काढून घेतले.
मालन यांची आरडाओरड एकून मदतीसाठी धावलेल्या तरुणाने सुरूवातीला पाठीमागचा बंद दरवाजा ठोठावला. त्यानंतर तो समोरच्या दरवाजात आला. त्यावेळी बाथरुममध्ये प्रवेश करण्याआधी त्याने आपल्या आणखी एका सहकाऱयाला बोलाविण्यासाठी हा तरुण पाठीमागे गेला. हीच संधी साधून भामटय़ाने घरातून पळ काढला.
मालन यांच्या घरातील दोन्ही भाडेकरुंनी बाथरुममध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्या बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. शाहूनगर येथे राहणाऱया त्यांच्या मुलीला व जावयाला संपर्क साधून ही माहिती देण्यात आली. थोडय़ाच वेळात त्यांची मुलगी रेखा या आईच्या घरी आल्या. त्यावेळी मालन यांना बाथरुममधून बाहेर काढण्यात आले. थोडय़ा वेळात त्या शुध्दीवर आल्या. त्यांनी कुटुंबियांना घडला प्रकार सांगितला. तोपर्यंत घरच्यांना कसलीच कल्पना नव्हती. मालन बाथरुममध्ये पडून बेशुध्द झाल्याचीच त्यांची समजूत झाली होती.
एकाकी वृध्द टार्गेट
एकंदर घटना लक्षात घेता एकाकी वृध्दांना गुन्हेगारांनी टार्गेट केल्याचे दिसून येते. मालन यांची मुलगी, जावई व नातवंडे त्यांच्या घरी येत-जात असतात. ते कामावर गेल्यानंतर काही काळासाठी त्यांना एकटे रहावे लागते. हीच संधी साधून भामटय़ाने घरात घुसून त्यांना बेशुध्द करुन त्यांच्या अंगावरील दागिने पळविले आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भामटय़ाने पाळत ठेवून हे कृत्य केले आहे का? असा संशय बळावला असून पोलीस तपासाअंतीच याचा उलगडा होणार आहे.
झटापटीत भामटय़ाची दाढी ओढली!
वृद्धेला लुटणाऱया भामटय़ाने आपला चेहरा झाकून घेतला होता. सुरुवातीला मालन यांनी प्रतिकार केला. तो तोकडा पडला. मालन यांच्या हाती भामटय़ाची दाढी लागली. ती त्यांनी ओढली. त्यामुळे सदर चोरटय़ाने दाढी ठेवल्याची माहितीही मिळाली आहे. शनिवारी रात्री यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता काहीच घडले नसल्याचे उत्तर मिळाले.
दागिने लुटून पलायन
वृद्धेचे डोळे झाकून बाथरुममध्ये नेऊन गळा आवळला
आरडाओरड ऐकून भाडेकरु तरुणांची धाव
बेशुद्ध पडलेल्या वृद्धेचे दागिने घेऊन चोरटय़ाचे पलायन