प्रांताधिकारी बळीराम चव्हाण यांना ग्रामस्थांचे निवेदन : शासनाला कळविण्याचे आश्वासन
सांबरा/वार्ताहर
सध्या बेळगाव बागलकोट महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून निलजी क्रॉस येथे ओव्हर ब्रिज उभारावे अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी बळीराम चव्हाण यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गावच्या दक्षिणेकडे सार्वजनिक तलाव असून गुरांना पाणी पिण्यासाठी रस्ता ओलांडून जावे लागते. तसेच दक्षिणेकडे निलजी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील शिंदोळी गाव आहे. नागरी वसाहतही आहे. त्यांचेही येथून नेहमीच येणे जाणे असते. त्यामुळे येथे ओव्हर ब्रिजची नितांत गरज आहे. गावची लोकसंख्या ही जास्त असून येथे ओव्हरब्रिज उभारल्यास सर्वांच्या सोयीचे होणार आहे. सध्या बेळगाव बागलकोट महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे येथे ओव्हरब्रिज बांधण्याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी मुतगे येथे प्रांताधिकारी बळीराम चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागणीबाबत सरकारला कळविण्यात येईल असे सांगितले. निवेदन देताना श्रीराम सेनेचे भरत पाटील, ग्रा. पं. सदस्य मधु मोदगेकर, हेमंत पाटीलसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.