नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा ः ब्लित्झ फेरीत चौथे स्थान, आता क्लासिक इव्हेंटला प्रारंभ
ओस्लो-नॉर्वे / वृत्तसंस्था
भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील ब्लित्झ इव्हेंटच्या सातव्या फेरीत विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. या निकालासह आनंदने चौथे स्थान संपादन केले.
या इव्हेंटमध्ये आनंदला पाचव्या फेरीत अनिश गिरीविरुद्ध तर नवव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्झिमे लॅग्राव्हेविरुद्ध पराभव पत्करावे लागले. साखळी फेरीअखेर तो 5 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.
गुणतालिकेत अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ले सो 6.5 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान असून कार्लसनपेक्षा तो एका गुणाने आघाडीवर आहे. डच ग्रँडमास्टर अनिश गिरी तिसऱया स्थानी आहे.
विश्वनाथन आनंदने नॉर्वेच्या आर्यन तारीविरुद्ध विजयाने शानदार सुरुवात केली. त्यानंतर वेस्लेविरुद्ध दुसऱया फेरीत बरोबरी मिळवल्यानंतर तिसऱया फेरीत त्याने बल्गेरियाच्या व्हॅसेलिन टोपालोव्हवर मात दिली. पुढे चौथ्या फेरीत अझरबैजानच्या तैमूर रॅजबोव्हविरुद्ध बरोबरी व पाचव्या फेरीत गिरीविरुद्ध पराभव, अशी त्याची कामगिरी राहिली. आनंदने नंतर चीनच्या हावो वांगविरुद्ध बरोबरी मिळवली आणि सातव्या फेरीत कार्लसनचा पराभव करत कोंडी फोडली. मात्र, शखरियार मेमद्यारोव्हविरुद्ध बरोबरी व लॅग्राव्हेविरुद्ध पराभवामुळे आनंदला टॉप फिनिशपासून दूर रहावे लागले.
या स्पर्धेत आता क्लासिक इव्हेंट सुरु होणार असून त्यात 10 ग्रँडमास्टर्सचा समावेश असणार आहे. आनंद आपल्या मोहिमेला लॅग्राव्हेविरुद्ध लढतीने सुरुवात करेल.