चिरंजीवी, अक्षय, मानुषी छिल्लर राहाणार उपस्थित
प्रतिनिधी /पणजी
गेल्या 9 दिवसांपासून पणजीत सुरु असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी येथे होणार आहे. ‘परफेक्ट नंबर’ या पोलंडच्या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा पडणार आहे. समारोपाला मेगास्टार चिरंजीवी, बॉलिवूड स्टार अक्षयकुमार आणि 2017 ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांची उपस्थिती लाभणार आहे.
यंदाच्या महोत्सवाला प्रतिनिधींचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि 10 हजार पेक्षा जास्त जणांची नोंदणी झाली. शेवटी नोंदणी बंद करावी लागली. यंदा कोरोनाचे संकट नसल्यामुळे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. पणजी येथील आयनॉक्स – 1 मध्ये दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत समारोपाच्या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. त्यानंतर मुखर्जी स्टेडियमवर समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी 4 ते 4.45 या वेळेत महोत्सवाच्या समारोपाअगोदर रेड कार्पेटचा समारोप होणार आहे.
मागील रविवारी 20 नोव्हेंबर रोजी मुखर्जी स्टेडियमवरच महोत्सवाचा उद्घाटन सोहळा झाला होता. त्यावेळी अजय देवगण, सुनिल शेट्टी, वरुण धवन, सारा अली खान असे चित्रपट क्षेत्रातील तारे उपस्थित होते. आता समारोपाला देखील उपरोक्त तारे हजर राहाणार आहेत. त्याशिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंदीय मंत्री अनुराग ठाकूर, श्रीपाद नाईक आदी मान्यवर उपस्थित राहातील. गेले 9 दिवस चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी महोत्सवाला हजेरी लावली. विविध राज्यातील अनेक सिनेरसिक, प्रतिनिधी त्या निमित्ताने गोव्यात आले आणि त्यांनी महोत्सवाचा आनंद घेतला. वाढलेल्या प्रतिनिधी संख्येमुळे गोव्यातील पर्यटनास चालना मिळाली. अनेकांना त्यामुळे व्यवसाय धंदा करण्याची संधी प्राप्त झाली.