पारोडा येथील घटना ; समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी तत्परतेने केली अग्निशामक दलाद्वारे मदतीची व्यवस्था
वार्ताहर /केपे
कुशावती नदीला आलेल्या पुरामुळे शुक्रवारी पारोडा ते पर्वत-पारोडापर्यंतचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. अशा परिस्थितीत पारोडा येथील गजानन पडियार यांचे घरीच निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या बाबतीत अडचण निर्माण झाली. मात्र पडियार यांच्या सुपुत्रांनी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती देताच त्यांनी अग्निशामक दलाच्या संचालकांशी संपर्क साधला आणि ताबडतोब मृतदेह हलवून अंत्यसंस्कार करण्याची सोय होईल याची काळजी घेतली.
मंत्री फळदेसाई यांनी संपर्क साधल्यानंतर ताबडतोब दुपारी कुडचडे येथील अग्निशामक दलाची दोन गाडय़ांतून पंधरा जणांची टीम घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. पारोडा ते पर्वत-पारोडा रस्ता इथपर्यंत सुमारे 1 किलोमीटर अंतर असून येथे एका माणसाहून जास्त उंच पाणी भरलेले असल्याने जवानांनाही बरीच अडचण आली. असे असताना अग्निशामक दलाच्या जवानांनी ‘सेफ्टी लाईन’ करून खास जॅकेटच्या मदतीने पाण्यातून मृतदेह दुसऱया टोकाला नेऊन तो गाडीतून मडगावला पाठवला. त्यानंतर स्व. पडियार यांच्या पार्थिवावर मडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ताबडतोब हालचाली करून जी मदत केली त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर कुडचडे अग्निशामक दलाच्या डी. जांबावलीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जवानांनी जे मदतकार्य केले त्याबद्दल त्यांचेही लोकांनी कौतुक केले आहे.