पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार नामकरण
वृत्तसंस्था / पोर्ट ब्लेअर
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा करण्यात येणाऱया पराक्रम दिनी अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्राने सन्मानित हुतात्म्यांची नावे दिली जाणार आहेत. 23 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बेटांचे नामकरण करणार आहेत. यातील सर्वात मोठय़ा बेटाला मेजर सोमनाथ शर्मा यांचे नाव दिले जाणार आहे. तर आकाराने दुसऱया क्रमांकाच्या बेटाला परमवीर चक्राने सन्मानित करम सिंह यांचे नाव देण्यात येणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला पराक्रम दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. अंदमानच्या रास बेटाला यापूर्वीच सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. अशाचप्रकारे नील बेट आणि हेवलॉक बेटाचे नाव अनुक्रमे शहीद बेट आणि स्वराज बेट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन
अमृत महोत्सवर्षी वर्षात सरकारने विस्मृतीत गेलेल्या शूरवीरांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. यानुसार 21 बेटांचे नामकरण परमवीर चक्राने सन्मानित हुतात्म्यांच्या नावावर होणार आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी हे बोस बेटावर निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय संग्रहालयाचेही उद्घाटन करणार आहेत.